July 24, 2026

वाळूज महानगर, (ता. 24) – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी मंदिर विश्वस्त मंडळ सज्ज झाले असून भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाकडून व्यापक बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संशयित-सराईत गुन्हेगारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

 

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त शनिवारी 25 जुलै रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईचा अभिषेक, महाआरती करण्यात येईल. यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होईल. यावेळी खा. संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट व मंदिर संस्थानच्या पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे. तर पहाटे 5 वाजता वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या हस्ते पाद्यपुजन व आरती घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले.

 


एकादशी निमित्त पंढरपूर येथे जवळजवळ 15 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात्रेदरम्यान होणार्या चोर्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी पर्स, मोबाईल, दागिने सुरक्षित व काळजी बाळगावी. वाढत्या गर्दीत वयोवृद्ध व लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. यात्रेतील इतर गुन्हे रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहे. यंदा प्रथमच पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या सुरक्षेसाठी चोरटे-भामटे यांच्यापासून सावध राहण्यासाठी वाहनातून एलइडी चित्रफितीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रुग्णवाहिका, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, प्रशाससकीय यंत्रणेसह स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावणार असून, कुठल्याही भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

यात्रा मार्गावर जागोजागी पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. टप्याटप्याने भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार असून, भाविकांनी सुरक्षितपणे दर्शन घेऊन, गोंधळ न घालता योग्य वेळात बाहेर पडावे. गर्दी अथवा दर्शन रांगेत जाताना आपल्या साहित्याची योग्य काळजी घ्यावी. पादत्राणे ठरवून दिलेल्या जागेवर ठेवून कुठलाही गोंधळ न घालता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
यावेळी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सहायक आयुक्त अशोक राजपूत यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पावसाचे आगमन लक्षात घेऊन, सर्व साहित्य जवळ ठेवून, अडचणीत काळात जागेवर मदत मिळेल. यासाठी नेमणूक स्थळी थांबवून भाविकांची काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पोलिस महासंचालक व पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, 14 पोलीस निरीक्षक, 1 एसआरपी टिम, 30 अधिकारी व 425 अंमलदार व 500 होमगार्ड असा हजारहून अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाविकांच्या सेवेसाठी दानशूर सरसवले –
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना फराळ, चहा, पाणी, केळी, राजगिरा लाडू, गूळ शेंगदाणे लाडू वाटप करण्यासाठी वाळूज परिसरातील दानशूर सरसवले असून ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्राम अभियान ग्रुप बजाजनगर तर्फे शेंगदाणा गूळ लाडू वाटप सेवा करण्यात येत आहे. हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येतो. या सेवेची सुरुवात 100 किलो पासून झाली. दरवर्षी 100 किलो वाढ करत मागील वर्षी 600 किलोचे वाटप केले. यावर्षी आषाढी एकादशी निमित्त शनिवारी 25 जुलै रोजी सकाळी 8 वाजता 700 किलोचे उद्धीष्ट आहे. साऊथ सिटी चौक A S क्लब समोर राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्व आमचे सेवेकरी, मित्र परिवार व सगेसोयरे सहभागी होतात. सर्व भाविकांनी या सेवेमध्ये सहभागी होऊन या वारीचा व आमच्या सेवेचा आनंद घ्यावा. अशी विनंती ग्राम अभियान ग्रुप बजाजनगर तर्फे करण्यात आली आहे.
—————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *