वाळूज महानगर, (ता.18) – आरक्षण म्हणजे जातीवाद नाही, केंद्र आणि राज्याची ही सुविधा आहे. जशी इतर बांधवांना आहे तशीच ती मराठा समाजासाठी पाहिजे. आणि तीच आपण मागतोय. असे मार्गदर्शनपर प्रतिपादन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (ता.18) आदर्श पाटोदा गावात केले. तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी 24 मार्च रोजी अंतरवली सराटी येथे निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीला आपण सर्वांनी उपस्थित रहावे. असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त निर्मलग्राम आदर्श पाटोदा येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (ता.18) रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी सकल मराठा समाज बांधवांना आरक्षणाचे फायदे व मराठा समाजाच्या एकीचे बळ यावर मार्गदर्शन केले.
प्रथम मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील त्यांचे पाटोद्यात आगमन होताच फटाक्याची आतषबाजी करून हलगीच्या वाद्यात मिरवणूक काढण्यात आली. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जरांगे पाटील यांनी आदर्श पाटोदा गावात प्रवेश केला.
तेथे गावकऱ्यांच्या वतीने माजी सरपंच भास्करराव पाटील पेरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील यांनी दहा टक्के आरक्षणाचा फायदा एका मराठी मुलीला फायदा झाला.
ती आयपीएसमध्ये 21 व्या रॅकवर होती. मात्र कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ती एकदम दुसर्या रॅकवर आली. ती आज मोठ्या पदावर नोकरी करते. असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर त्यांनी पाटोदा ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील, उपसरपंच कपिंद्र पेरे व ग्रामपंचायत सदस्यांनी यांनी स्वागत केले कार्यक्रमास माजी सरपंच कल्याणराव पेरे पाटील, शिवस्मारक समिती अध्यक्ष गणेश मुचक, बाळासाहेब पेरे, हरिश्चंद्र मातकर, विष्णू राऊत, बाळासाहेब मातकर, चंद्रकांत पेरे, नितीन पेरे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
