
वाळुज महानगर, (ता.16) – वऱ्हाड घेऊन जाणारी बोलेरो आणि ऊस वाहतूक करणारी पिकअप यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.16) रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहगाव तालुका पैठण येथील गिरी आणि डांगे कुटुंब श्रीरामपूर येथील लग्न समारंभ उरकून बोलेरो जीप (एम एच 20,ई ई -3217) मधून परतत होते. तर पिकअप (एम एच 20, ई एल -9070) रसवंतीसाठी लागणारा ऊस घेऊन वाळुज मार्गे पुण्याच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने एकाच वेळी इसारवाडी फाट्यावर आली. वऱ्हाड घेऊन जाणारी बोलेरो ईसारवाडी फाट्याकडे वळण घेत असताना त्यांच्यात जोराची धडक झाली. अपघातामुळे मोठा आवाज येताच शेजारीच असलेले हॉटेल मालक, कर्मचारी आणि इतर प्रवाशांनी तात्काळ धावपळ करून मदत केली.
या अपघातामध्ये आशिष सुखदेव गिरी (21), राजश्री गजानन गिरी (12), ऋतुजा आशिष गिरी (20), आकांक्षा गजानन गिरी (18), प्रतीक गजानन गिरी (10), अनिता संदीप डांगे (30), वैभव संदीप डांगे (10), रेखा अर्जुन डांगे (14) व सिंधू गिरी (44) सर्व राहणार लोहगाव ता. पैठण हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच लिंबेजळगाव पॉईंटवर असलेली श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमींना तात्काळ उपचारार्थ घाटीत दाखल केले. या अपघाताची नोंद वाळूज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
