March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.10) – रेडीमेड कपड्याचे दुकान बंद गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटात आग लागून कपड्याने पेट घेतला दरम्यान या आधीची जळ शेजारी असलेल्या दोन दुकानांना लागल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आगीची घटना वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे मुख्य रस्त्यावर रविवारी (ता.10) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीचे कारण स्पष्ट जरी होत नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटने लागले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मुख्य रस्त्यावर व्यंकटेश कवठेकर यांचे व्यंकटेश मसाला सेंटर, गणेश लाडणे यांचे श्री गणेश मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रिकल्स तसेच अमजद खत्री यांचे धमाका रेडीमेड सेल अशी सलग दुकाने आहेत.

रविवारी (ता.10) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास अमजद खत्री यांनी रेडीमेड कपड्याचे दुकान बंद करून घरी गेले असता केवळ दहा ते पंधरा मिनिटातच त्यांच्या रेडिमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. शटर बंद असल्याने ही आग अधिक भडकली. त्यामुळे आगीचे लोट व धूर मोठ्या प्रमाणात बाहेर येत होता. आगीची माहिती मिळताच अमजद खत्री हे रस्त्यातूनच परत आले मात्र तोपर्यंत दुकानातील रेडिमेड कपडे जळून खाक झाले होते.

या आगीची झळ शेजारी असलेल्या वेंकटेश मसाले सेंटर व गणेश मोबाईल शॉपी आणि इलेक्ट्रिकल्स या दुकानाला बसली. त्यामुळे त्यांच्याही दुकानाचे नुकसान झाले. यात श्री गणेश मोबाईल शॉपीचे किरकोळ तर व्यंकटेश मसाले सेंटरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आगीची माहिती मिळताच माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शेजुळ, गणेश हिवाळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या ठिकाणी ही आग लागली ती बाजारपेठ असल्याने ही आग जास्त भडकण्याची शक्यता लक्षात घेता तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.

दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तसेच 108 या सरकारी रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत घेतली. मात्र सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीचे कारण समजू शकले नसले तरी ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गर्दी पांगवण्यासाठी पाण्याचा मारा –
मुख्य रस्त्यावर असलेल्या या दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलास अडचण होत होती. पोलिसांनाही काही केल्या ही गर्दी आवरेना. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी गर्दी पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *