March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.6)- कुठल्याही सुविधा न देता अव्वाच्यासव्वा विजबिले देऊन महावितरणकडून वीज ग्राहकांची प्रचंड लूट करण्यात येत आहे. जोपर्यंत महावितरण वीज ग्राहकांना योग्य वीज पुरवठा करत नाही. तोपर्यंत वीज ग्राहकांनी वीज बिले भरू नये. महावितरण कर्मचाऱ्यांनी दमदाटी, वीज कट करण्याची भाषा वापरल्यास कायद्याचे रुम्हणे हातात घेऊन त्यांना धडा शिकवा. असे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केले.

पंढरपूर येथे मंगळवारी (ता.6) रोजी महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या जनजागृती अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत सदस्य रोशन शहा व आम्मा ग्रुपच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत नागरिकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत महावितरणने वीज ग्राहकांना सुरक्षित व नियमित वीज देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. तसेच विज पुरवठा संदर्भात वीज ग्राहकांना अडथळा आल्यास उच्च न्यायालयाने महावितरणला प्रत्येक तासाला पन्नास रुपये दंड आकारल्याचे सांगत हा दंडाचा पैसा वीज ग्राहकांना देण्यात यावा. असे आदेश दिले आहे. सध्या कोर्टाने महावितरणला त्यांच्या अपुऱ्या सुविधा संदर्भात दररोज 6 हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. तसेच 47 लाख रुपये दंड महावितरणला आत्तापर्यंत आकारण्यात आला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी जोपर्यंत तुमची सर्व कामे जसे वाढीव वीजबिल, बंद पडलेले मीटर, रस्त्यावरील पोल, वीज कनेक्शन वेळेवर मिळत नाही. तोपर्यंत कुठलीही वीज बिले भरू नका. विज बिल भरण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन बंद करण्याचे, दमदाटी करण्याच्या धमक्या दिल्यास उच्च न्यायालयाची ऑर्डर त्यांना दाखवा. कायद्याचे रूम्हणे हातात घेऊन महावितरणला वठणीवर आणण्यासाठी व महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करा. आपल्याला काही अडचण आल्यास मी स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहील. असे आश्वासन यावेळी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिले.
सत्ताधाऱ्यांना घेतले फैलावर –
यावेळी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी खासदार इम्तियाज जलील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पालकमंत्री संदिपान भुमरे आदींना फैलावर घेतले. सत्ताधारी हे कधीच तुम्हाला वीज बिले भरू नका असे सांगणार नाही. कारण त्यामध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला आहे. मात्र मी सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या पाठीशी उभा असल्याने जे कामे सत्ताधाऱ्यांना करायची, ती मी कायद्याच्या चौकटीत राहून उच्च न्यायालयात महावितरणच्या विरोधात अपील दाखल करत करून घेतले. त्यामुळे कायदा वीज ग्राहकांच्या बाजूने आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे. असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले. कार्यक्रमास मेहबूब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य रोशन शहा, जावेद शेख, सावेर शहा, गंगाधर खोतकर, आमिर पठाण, चेतन यादव, रोहित राऊत, दिनकर पवार, कैलास जाधव, सुमनबाई उबाळे, नजमा चाऊस, बाबा बेग, शोभाताई पारपिल्ले आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *