
नुतन वर्षाभिनंदन : इंग्रजी नववर्ष
“शुभदायी अपेक्षेचे कोंदण”
01-01-2024
एका आंग्ल (इंग्रजी) वर्षाची काल समाप्ती होत आज नववर्षास जोमाने सुरूवात झाली. या प्रारंभासमयी सर्वांना मनस्वी शुभेच्छा.2023 अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेलं होतं. एकीकडे हजारो स्नेहीजन हितचिंतकांची मांदियाळी. त्याचवेळी काही असेही लोकं आढळले ज्यांच्या मनात असूया, निगेटिव्हिटी आणि द्वेष भरलेला होता. त्यामुळेच काहींनी आनंद आणि समाधान भरभरून दिलं तर काहींनी त्याचवेळी चंद्रावरचे डागच बघितले. ते लोकांना सांगण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यातून अनुभव घेत, शिकत एका नव्या उमेदीने नव्या वर्षात पाऊल टाकतो आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह असाच बरसत राहो या आशेवर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचा प्रारंभ करत आहे.
पृथ्वीच्या सूर्याभोवती 1 फेरी पूर्ण करण्याचा कालावधी म्हणजे 365 दिवस =1 वर्ष होय. इंग्रजी कालगणनेचे इंग्रजांचे हे नववर्ष तर्कशुद्ध, अचूकता या पातळीवर जवळपास जगभर सर्वत्र वापरले जाते ते फक्त कार्यालयीन कामकाजाकरिता. माझ्यासह आपण सर्वचजण रोजच्या जीवनात इंग्रजी कॅलेंडर वापरतो. सुर्योदय ते सुर्यास्त तो नित्य होत आहे हजारो वर्षे याचा हिशेब ठेवण्यासाठी त्याची गणना सुरु झाली.
इंग्रजी वर्ष हे चांद्रवर्षही नाही व सौरवर्षही नाही. फार तर त्याला ‘पृथ्वीवर्ष’ म्हणू शकतो. पृथ्वीच्या स्वतः भोवती व फिरण्याशी निगडीत असल्यामुळे! जगभर फक्त कार्यालये, शाळा, प्रवास यांकरिताच त्याला वापरतात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख आपल्या सण, उत्सव, लग्न, अशा विविध संस्कारांचे समारंभ यांकरिता फक्त ‘चांद्रवर्षच’ वापरतात. ख्रिश्चनधर्मीय वगळता जगभरात धार्मिक, आध्यात्मिक दृष्टीने इंग्रजी वर्ष फक्त संदर्भाला वापरतात. त्याला आत्मिक, भावनिक, धार्मिक अधिष्ठाण नाही.
प्रत्येक वर्ष कसं पुस्तकासारखंच असतं ना! 365 दिवसांचं! जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं. नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, नवी नाती, नवं यश, नवा आनंद. कधी अपूर्ण, कधी संपूर्ण, नवा हर्ष, नवं वर्ष.
जुने वादाचे, किल्मीषाचे मळभ दूर सारून, नव्या सोनेरी पहाटेचा स्विकार करूयात. सरत्या वर्षातल्या कटू अनुभवांना मागे सोडून, मदतीचा, मायेचा हात देणारी माणस लक्षात ठेवून, देणाऱ्या हातांचं दातृत्व आपल्या हाताला मिळावं आणि नव्या वर्षात नव्याने सगळ्याच बाबींची पुन्हा सुरुवात व्हावी, आपल्याला कुणीतरी उभं राहायला हात दिला, आपल्याला कुणाला तरी हात देण्याची संधी मिळावी. नविन वर्ष, नव सुरुवात, नव्या संधी, नव्या क्षितीजावर उडण्यासाठी सज्ज होऊ. नवीन वर्षात आपण काही संकल्प करतो आणि त्यावर त्या वर्षाची रूपरेषा ठरलेली असते. आपले ते सगळे संकल्प पूर्णत्वास जावो हीच मनापासून इच्छा.
कालचा सूर्यास्त अमंगल आठवणी गिळंकृत करणारा. तर आजचा अरुणोदय सर्वांच्या जीवनात नवे सूर अन नवे तराणे, नव चैतन्य आणणारा. या जीवनातील, भवनातील हे मवाळ सूर आता कायमचे निघून जावोत ,हीच प्रार्थना करुन सिद्ध होवू या उद्याच्या मंगलमय शुभंकर सूर्योदयासाठी. तो घेऊन येईल आपल्या जीवनात नित्य नूतन ‘आनंदी पहाट’.
“मननात त्रायति इति मंत्र:।” तंत्र व मंत्र दोन्ही आवश्यक आहेत. माणसाचा अहंकार मोडून नवी दृष्टी जीवनाकडे बघण्याची व जगण्याची मिळेल अशी आशा करूया. हे चिंतन सर्वाना “एषा पंथ: एतत कर्म” अशी निश्चयात्मका बुद्धी देणारे ठरो. अशीच प्रार्थना, सदिच्छा, शुभेच्छा. आशा, संकल्प, उत्साह, चिंतन, कल्याणकारी विचार यांचे नियोजन कालसुसंगत हवे. वर्तमानाला लक्षात घेऊन हवे. हे बुद्धिमान व्यक्तीचे कर्तव्य आहे. यावर्षी एक अभिनव संकल्प करुया.
‘सरत्या वर्षात जपलेले ऋणानुबंध पुढेही जपण्याचा.’
‘माणसाशी माणसं जोडण्याचा.’
अधर्मा ची अवधी तोंडी I
दोषांची लिहिली फाडी II
सज्जनां करवी गुढी I
सुखाची उभवी II
(ज्ञानेश्वरी -अध्याय 4 था,ओवी 52 वी)
‘इच्छितं पत्थितं तुव्हं खिप्पमेव समिज्झत’
‘सब्बे पुरेन्तु चित्तसंकप्पा चन्दो पन्नरसो यथा ||’
“भवतु सब्ब मंगलम् ,”
“रख्खन्तु सब्ब देवता !”
“सब्बे बुध्दानुभावेन,”
“सदा सोत्थि भवन्तु ते !!”
या भवनातील गीत पुराणे
मवाळ हळवे सूर
जाऊ द्या आज येथुनी दूर
भावभक्तीची भावुक गाथा
पराभूत हो नमवील माथा
नवे सूर अन् नवे तराणे
हवा नवा तो नूर
जाऊ द्या दूर जुने ते सूर…
” नववर्षांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”
सौजन्य –
राजेश हिवाळे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.
