
वाळूज महानगर, (ता.28) – संप फोडण्याचा प्रयत्न व दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप करत
आय.सी.डी.एस. आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (ता.27) रोजी निदर्शने करण्यात येऊन ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे व उपसरपंच नजीरखा पठाण यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की संपाच्या कालावधीत गेल्या 22 दिवसापासून अंगणवाडी केंद्र बंद आहेत. तसेच निदर्शने, धरणे, मोर्चे, जेलभरो, घेराव आदी मार्गाने राज्यभर आंदोलन देखील सुरु आहे. औरंगाबाद येथे जिल्ल्हाधिकारी कार्यालयावर 7 डिसेंबर रोजी 6 हजार कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला व जिल्हाधिकारी पांडे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती. तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर देखील 18 डिसेंबर रोजी लाखभर कर्मचारयानी आयटकच्या नेतृत्वाखालो विराट मोर्चा काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांनी अंगणवाडी सेविका व मदतणीस यांच्या मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली असताना आय.सी.डी.एस. आयुक्त रुबल अग्रवाल मात्र दहशत निर्माण करीत आहेत. व संप फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आहार वाटप, पूर्व शालेय शिक्षण या अंगणवाडी सेविकांच्या कामासाठी तात्पुरत्या स्तरावर ग्रामपंचायत कर्मचारी, बचत गट आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यावर जबाबदारी देण्यासंबधी रुबल अग्रवाल निर्देश देत आहेत. याचा सर्व अंगणवाडी कर्मचारी तीव्र निषेध करीत आहे. ही कामे आपल्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामपंचायत, आशा स्वयंसेविका, शालेय पोषण आहार, बचत गट आदी कर्मचाऱ्यांना आपण देऊ नये व अंगणवाडी केंद्राच्या चाब्या घेण्याचा प्रयत्न करू नये. अशी विनंतीवजा मागणी आयटकच्या वतीने ग्रामपंचायत समोर निदर्शने करून निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच संपकरी अंगणवाडी कर्मचार्याना सहकार्य करावे, त्यांच्या संपाला पाठिंबा द्यावा व ग्रामपंचायतने तसा ठराव करावा व हे निवेदन आपल्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवावे. असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच रुबल अग्रवालच्या दहशतीविरोधात 1 जानेवरी रोजी राज्यभर जेलभरो आंदोलन देखील आयटकच्या वतीने करण्याचा इशारा यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा वतीने देण्यात आला.
