वाळूजमहानगर, (ता.30) – आपण समाजाचे काही देणे लागतो, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाने प्रेरित झालेल्या एका ध्येयवेढ्या तरुणाने धाराशिव ते मंत्रालय, मुंबई पायी गाठली. आता तो पायीच नागपूरच्या दिशेने रवाना झाला असून हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाविषयी आवाज उठवावा असे साकडे सर्वच आमदारांना घालणार आहे.
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमाणेच मराठा आरक्षणासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पाऊले उचलत आहेत. अशाच एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी पायी वारी सुरू केली आहे. विशाल हनुमंत पवार,(वय 30) रा. करंजकल्ला ता. कळंब, जि. धाराशिव असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणासाठी त्याने धाराशिव येथून 28 ऑक्टोबर रोजी पायी प्रवास सुरू करत सहाव्या दिवशी मुंबई गाठली. राज्य गृहमंत्री शंभूराजे देसाई तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव यांची मंत्रालयात भेट घेत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी केली.
आणि याच मागणीसाठी तो पायीपायीच उपराजधानी नागपूरकडे निघाला. येत्या 7 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडावा. व मराठा आरक्षण मिळवून द्यावे. असे साकडे तो सर्वच आमदारांना घालणार आहे. मुंबई ते पुणे व पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गे नागपूरकडे निघालेला हा तरुण गुरुवारी (ता.30) रोजी वाळूज परिसरातून नागपूरच्या दिशेने पायी जात होता.
