वाळूजमहानगर, (ता.27) – संभाजीनगर येथील मूल्यसंस्कार मेळाव्याच्या निमित्ताने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांच्या पावन सानिध्यात हजारो अबाल वृद्धांच्या उपस्थितीत व अत्यंत भक्तिमय उत्साहपूर्ण वातावरणात मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा सोमवारी (ता.27) रोजी झाला.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने 26 व 27 नोव्हेंबर या दोन दिवसीय उपक्रमाच्या माध्यमातून मूल्यसंस्कार मेळावा व मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा सिडको वाळूज महानगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुरुमाऊलींनी मार्गदर्शन करून
वृद्धाश्रम मुक्त भारत अभियानांबाबत मार्गदर्शन करून तणाव मुक्त जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला.
तत्पूर्वी सिडको वाळूज महानगर येथे रविवारी (ता.26) नोव्हेंबर रोजी विविध विषयावरील ज्ञानदालनांचे गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा, गुरुपुत्र श्री नितीन भाऊ, आमदार संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन झाले. कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या विविध ज्ञानदालनांना अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भेट दिली.
कार्यक्रमस्थळी ऋषी-मुनींचे वेद- विज्ञान संशोधनाचे सादरीकरण, सात्विक आहार, निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन, युवकांच्या व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, करियर, नोकरी बाबत अचूक मार्गदर्शन, सण-वार- व्रत-वैकल्यांबाबत भारतीय आणि वैज्ञानिक सादरीकरण दुर्गसंवर्धन कार्य आणि इतिहासामधील शस्त्रांचे प्रदर्शन, पारंपरिक खेळांचे महत्त्व आणि सादरीकरण, मुलांचा सर्वांगीण आणि पंचेंद्रिय विकासावर मार्गदर्शन, आजीबाईच्या बटव्याचे महत्त्व भारतीय कायद्यांची माहिती, सेवा मार्गातील सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण व मांडणी अशी अनेक वैविध्यपूर्ण ज्ञानदालन सर्वांसाठी आकर्षक ठरली.
सायंकाळी 6 वाजता गुरूपुत्र आदरणीय श्री आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहसंस्कार विभागाच्या वतीने तुलसी-दामोदर विवाह सोहळा उत्साहात झाला. सोमवारी (ता.27) नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक मातृ-पितृ पाद्य पूजन सोहळा परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या पावनक्षणी उपस्थित भाविकांना परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या मौलिक हितगुजातून मार्गदर्शन केले.
प्रथम गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
वृद्धाश्रम ही संकल्पना भारतीय संस्कृतमध्ये मान्य नाही. असे परखड मत मांडताना परमपूज्य गुरूमाऊलींनी मुल्यसंस्कार अभियान तळागाळातील लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केले. 20 टक्के अध्यात्म आणि 80 टक्के समाजकार्य या सुत्रातून सेवाकार्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्राम व नागरी विकास सक्षमीकरण अभियानाच्या कार्यप्रणाली विषयी त्यांनी उपस्थितांबरोबर अमृततुल्य हितगुज केले.
या सुरुवातीला गुरुमाऊलींनी नव्या वर्षाच्या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम मराठवाड्यातून होते. मात्र यावेळी हा कार्यक्रम देव दिवाळीचे औचित्य साधून व त्रिपुरा पौर्णिमेचा मुहूर्त मराठवाड्यातील सेवेकर्यांनी साधून नव्या वर्षापूर्वी घेण्यात आला. खरे तर असे उपक्रम देशात होणे गरजेचे आहे. या उपक्रमाची एक ग्रंथ मालिका होऊन ती शालेय अभ्यासक्रमात आणावी. जे शाळेत शिकविल्या जात नाही, त्या गोष्टी मुलांच्या अंतकरणापर्यंत पोहोचवल्याने एक नामी शक्ती आपण सर्वांनी दिलेली आहे. यात आपल्या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. नवीन पिढी घडविणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, त्यांना देशाविषयी, धर्माविषयी, संस्काराविषयी, आई वडीला विषयी, संस्कृती विषयी प्रात्यक्षिक अनुभव शिकण्यास भाग पाडणे. अशा या साऱ्या बाबी आपण काल पासून व गेल्या अनेक वर्षापासून सेवा केंद्राच्या माध्यमातून अनुभवत आहात.
मराठवाडा ही संतांची भूमी आहे, एकनाथ महाराजांच्या काळात त्यांनी दहा हजार संत घडवले. महाराष्ट्रातील सर्वच संत मालिकेचा त्यात समावेश आहे. त्यांची विचारसरणी अंगीकारत अंतर बाह्य शरीराची, मनाची, घराची जडणघडण आमचे बहुजन प्रतिनिधी वाड्या, पाड्यात, शाळेत भेटी देऊन त्यांचं सर्वांगीण सक्षमीकरण करत असतात. संस्कार हे अंतकरणावर झाले पाहिजे, डोक्यावर तर कोणीही करेल. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच धर्म आणि देश टिकेल. असा उपदेशपर संदेशही गुरुमाऊलींनी यावेळी दिला. तसेच मोडलेले संस्कार पुन्हा जोडणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे, देशसेवा करताना शहीद झालेल्या शूरवीरांच्या मुलामुलींचे विवाह करण्याची सेवा ही समाजाने करावी. असेही ते म्हणाले.
या ऐतिहासिक उपक्रमास छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, करोडी येथे कार्यक्रमास जागा उपलब्ध करून देणारे रामनाथ नवले, अॅड. सचिन डंख, माजी आमदार नितीन पाटील, जिल्हा न्यायमूर्ती प्रतिभाताई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, माजी महापौर किशोर बापू घडामोडे,
रत्नपुर येथील भद्रा मारुती संस्थांचे बारगळ, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, वडगाव (को.) बजाजनगरचे सरपंच सुनील काळे, माजी सरपंच सचिन गरड, वडगाव (को.)चे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, उद्योजक कैलास भोकरे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, मनसेचे काकासाहेब सापे पाटील, तिसगाव चे माजी उपसरपंच नागेश कुठारे, रांजणगावचे पंचायत समिती सदस्य दीपक बडे, उद्योजक अमोल लोहकरे, युवासेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
क्षणचित्रे – रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने कार्यक्रमासाठी करोडी येथे उद्योजक रामनाथ नवले यांनी जागा उपलब्ध करून दिली. कार्यक्रम स्थळी आकर्षक सडा रांगोळी काढण्यात आली होती. माऊलींच्या आगमनासाठी फुलांची आरास, माऊलींच्या स्वागतासाठी भाविकांनी हातात प्रबोधनात्मक फलक घेऊन दुतरफा घातलेले कडे, मुलांनी तसेच मुलींनी सादर केलेले लेझीम व ढोलचे प्रात्यक्षिके, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीचे माऊलींच्या हस्ते स्वागत, कार्यक्रमास झालेली अलोक गर्दी व त्यामुळे सर्वांना माऊलींचे दर्शन व मार्गदर्शन ऐकता यावे पाहता यावे यासाठी सभा मंडपाच्या बाहेर लावलेली भव्य एलईडी स्क्रीन आदीसह अनेक प्रमुख आकर्षण या कार्यक्रमाचे ठरले.
