
वाळूजमहानगर, (ता.22) – संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी मुख्य दुआ होऊन वाळुज येथे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तब्लिग इजतेमाचा समारोप भक्तीमय वातावरणात मंगळवारी (ता.21) रोजी झाला. यावेळी मौलाना जावेद पुनावाले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मोहम्मद पैगंबर (स.) यांचे अनुयायी सहाबा यांनी केलेले त्याग, भक्ती आपल्या आचरणात आणणे आवश्यक असल्याचे मौलाना जावेद यांनी सांगितले. पैगंबर मोहम्मद (स.) यांनी सांगितलेल्या कलमा, नमाज, जकात, उपवास व हज या पाच वचनी कलमांचे पालन करून जीवन साकारावे. तसेच सर्वांनी आपल्या संपत्तीतून दरवर्षी जकात काढून गरजूंना वाटप केली तर या जगातून गरिबी, भूक कायमची नष्ट होईल. असेही ते म्हणाले. आपल्या आचरणाने इतर धर्मातील नागरिकांनाही आपल्या धर्माविषयी कुतुहुल निर्माण होईल. असे वागावे. 
तुम्ही कितीही सदाचारी असाल मात्र तुमचा शेजारी तुमच्यावर नाराज असेल तर सर्व व्यर्थ आहे. शेजाऱ्यांविषयी त्यांचे असलेले हक्क त्यांना द्यावे, त्यांच्याशी आपुलकीने वागावे. या कार्यात घरातील महिलांना, मुलांना सहभागी करत त्यांच्यावर योग्य ते संस्कार उपजवा, एक महीला शिक्षित झाली तर संपूर्ण पिढी सुसंस्कारी बनेल असे ही ते म्हणाले. दरम्यान चार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा साधेपणाने संपन्न झाला. दोन दिवसापासून सुरु असलेल्या तब्लिक इस्तेमा निमित्ताने आलेल्या साथींना विविध धर्मगुरूनी केलेला प्रवचनांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
