
वाळूजमहानगर, (ता.10) – दिवाळी सणानिमित्त अनेक कामगार गावी जातात. त्यामुळे अनेक घरं व कारखाने बंद असतात. अशावेळी चोरीची शक्यता नाकारता येत नाही. चोऱ्यांना बसावा म्हणून पोलिस रात्रीची गस्त घालणार आहे. मात्र उद्योजक व व्यापाऱ्यांनी आपापली जबाबदारी म्हणून सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी गुरुवारी (ता.9) रोजी शांतता समितीच्या बैठकीत केले.
दिवाळीचा सण सर्वात मोठा असतो. कारखान्यांना चार-पाच दिवस सुट्टी असते. त्यामुळे अनेक जण गावी जातात. तुरळक वगळता अनेक कारखाने बंद असतात. घरही बंद असतात. अशावेळी चोरीची दाट शक्यता असते. म्हणून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.9) रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव व दुय्यम निरीक्षक गणेश ताठे यांनी विविध सुचना केल्या आहेत. यात प्रामुख्याने कंपनीत आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमणे,
संशयित दिसल्यास पोलिसांना माहिती देणे, कंपनीत काम करणार्या कामगारांची चारित्र्य पडताळणी करणे, ग्रामीण भागात ग्रामसुरक्षा दलांमार्फत रात्रभर गस्त घालणे आदी सुचना उद्योजक, व्यापारी व नागरिकांना देण्यात आल्या.
या बैठकीला मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, अब्दुल शेख, दुष्यंत आठवले, बाळकृष्ण इंडस्ट्रीजचे आबासाहेब वाघमारे, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे राजेंद्र मुदखेडकर, डब्ल्यू आयएचे वसंत वाघमारे, बजाज ऑटो चे जे पी कुलकर्णी, इंडूरन्सचे गजानन मालोदे, स्टरलाईटचे दीपक जोनवाल, आर.के.सिंग आदींची उपस्थिती होती. ही बैठक यशस्वी करण्यासाठी पोहेकॉ.अभिमन्यु सानप, पोकॉ.विक्रम वाघ, पोलीस अंमलदार योगेश शळके यांनी परिश्रम घेतले.
