
वाळूजमहानगर (ता.08) – आदर्श ग्राम पाटोदा येथील प्रसन्न शिक्षण संस्था संचालित सह्याद्री स्कूलमध्ये दिवाळी महोत्सवाचे आयोजन करण्यात येऊन विविध उपक्रमासह पर्यावरण पूरक दिवाळी बुधवारी (ता.8) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वळदगावचे सरपंच अमरसिंग डांगर, संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के, शाळेचे संचालक प्रभाकर म्हस्के, मुख्याध्यापक निलेश म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

हल्लीच्या व्यस्त जीवनशैली आणि विभक्त कुटुंबांमुळे मुलांना सण, परंपरा, चालीरीती यांची भुरळ पडत चालली आहे. मुलांना त्याचे महत्त्व समजावे त्याचा आनंद घेण्यात यावा. म्हणून दिवाळीनिमित्त दरवर्षी सह्याद्री स्कूल हा विशेष उपक्रम राबवते. दरवर्षी काहीतरी नवीन आणि वेगळे विषय हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असते. यावर्षी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जंजिरा किल्ला तसेच पद्मदुर्ग किल्ला उभारला. किल्ला उभारणी करताना निर्मला म्हस्के यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित भव्य रांगोळी लक्ष्मीदेवीची रांगोळी, फुलांपासून तयार करण्यात आलेली भव्य रांगोळी, विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले निरनिराळ्या आकारांचे व रंगांचे आकाश कंदील, तसेच गरजूंपासून खरेदी केलेल्या पणत्या व स्वतःच्या हातांनी रंगवलेल्या पणत्या तसेच दिवाळीसाठी स्वतः तयार केलेली कागदी सजावट.
अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शनी यावेळी शाळेत भरवण्यात आले होते. यामुळे वातावरण रंगून गेले होते. या प्रदर्शनासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली व सह्याद्री स्कूल फक्त शिक्षण देण्याचे काम करत नाही तर त्याचबरोबरीने मुलांना चांगले संस्कार देण्याचेही काम करते. अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. मुख्याध्यापक निलेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ज्या प्रकारे आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने भरभराटीने दिवाळी साजरी करतो तसेच आपल्यामुळे तसाच आनंद इतरांच्याही चेहऱ्यावर दिसावा म्हणून प्रत्येकाने दिवाळीच्या पणत्या, आकाश दिवे, इतर लहान मोठे साहित्य गरजूंकडून खरेदी करून त्यांचीही दिवाळी आनंदाने साजरी करण्यास हातभार लावावा. असा संदेश संस्थेच्या अध्यक्षा निर्मला म्हस्के यांनी विद्यार्थी व पालकांना दिला. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरती यादव, सुप्रिया गणगे, शितल महाले, ज्योती साळवे, मोनिका निर्मले, रत्नप्रभा पाटील, पूनम पाठक, शिल्पा पोफळी, प्रियंका गायकवाड, देबारती घोष, अभिषेक गौंड, कविता भराडे, आरती खंडागळे, रुचिका मेहेत्रे, जया पगारे, परमेश्वर तवार, भाग्यश्री माचवे, माधवी कुलकर्णी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
