वाळूज महानगर, (ता.18) – मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिलेल्या एका अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. आणि मॉर्निंग वॉक करणारे तरुण व पोलीस मदतीसाठी धावले. तात्काळ दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे नवजात अर्भकाचे प्राण वाचले. हा प्रकार वाळूज परिसरातील तिसगाव चौफुली येथे बुधवारी (ता.18) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील तिसगाव चौफुली येथे कोणीतरी अज्ञात महिलेने स्त्री जातीच्या एका नवजात अर्बकाला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले. मात्र म्हणतात ना,’देव तारी, त्याला कोण मारी’. म्हणूनच तेजस घुगे समाधान घुगे, किरण नरवडे हे देवाच्या रूपात बुधवारी (ता.18) रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत होते.
रस्त्याच्या कडेला अंधारात त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहीले असता नुकतेस जन्मलेले स्त्री जातीचे बाळ त्यांना दिसले.
ही माहिती त्यांनी तात्काळ वाळुज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रशांत सोनवणे यांनी घटनास्थळी धाऊन आले. त्यांनी नवजात अर्भकाला कविता साळुंके व जयश्री अर्दड यांच्या मदतीने उपचारार्थ घाटी दवाखान्यात दाखल केले. सुदैवाने हे बाळ सुखरुप असून त्याच्या आईचा शोध सुरू आहे. अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मले, म्हणूनच त्याला मरण्यासाठी रस्त्यावर फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असावा. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कर्तव्यदक्षता –
मॉर्निंग वॉक करणारे तरुण व वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे या नवजात अर्भकाचे प्राण वाचू शकले. त्यामुळे ते खरोखरच कौतुकास पात्र ठरतात. अशी भावना जनमानसातून दिसत आहे.
