March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.27) – चोरी गेलेल्या एका सायकलचा तपास करताना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्याकडून विविध ठिकाणाहून चोरी केलेल्या जवळजवळ 1 लाख 10 हजार रुपये किमतीच्या 20 रंगीबेरंगी सायकली जप्त केल्या. ही कारवाई बुधवारी (ता.27) रोजी करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संकेत गंगाधर कुबेर (13 वर्ष) हा भोंडवे पब्लिक स्कूल बजाजनगर येथे आठवीमध्ये शिकतो. त्याची रेंजर सायकल 16 सप्टेंबर रोजी चोरी गेली होती. या चोरी गेलेल्या एका सायकलच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोउपनि दिपक रोठे यांना गोपनीय माहीती मिळाली की, साजापुर येथे सायकल विक्रीसाठी एक जण आला असुन त्याने यापुर्वीही अनेक सायकली विकल्या आहेत. त्यावरुन पोउपनि दिपक रोठे यांनी त्या ठिकाणी स्टाफसह सापळा रचुन संशयित इसम आशिष नंदु कांबळे वय 19 वर्ष रा. सलामपुरेनगर वडगाव (को.) यास ताब्यात घेवुन त्याच्या जवळ असलेल्या सायकल बाबत विचारपुस केली. मात्र त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन आरोपीस अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने यापुर्वी चोरलेल्या अनेक सायकली साजापुर भागातील महिलांना विकल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी आशिष कांबळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या 1 लाख ,9 हजार 800 रुपये किमतीच्या व विविध कंपनी व रंगाच्या 20 सायकली काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त करून आरोपीस अटक केली. ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सपोनि. गौतम वावळे, पोउपनि. दिपक रोट पोना. धिरज काबलिये, पो. अंमलदार सुरेश कचे, अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, हनुमान ठोके, सुरज अग्रवाल, राजाभाऊ कोल्हे यांनी केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *