March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.19) – गणेश उत्सवाचे औचित्य साधून रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने अयोध्येतील राम मंदिरासारखेच हुबेहूब व भव्य मंदिर उभारले जात आहे‌. यासाठी पंधरा ते वीस कामगार रात्रंदिवस राबत असून हे राममंदिर गणेश भक्तांसाठी लवकरच खुले होणार असल्याचे मंडळाच्या वतीने मंगळवारी (ता.19) रोजी सांगण्यात आले.

गणेश उत्सवानिमित्त वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री संत सावता नवतरुण सार्वजनिक गणेश मंडळ दरवर्षी विविध देखावे साकारून सर्वांना आकर्षित करत असते. त्यामुळे या मंडळाकडे गणेश भक्तांची पावले आपोआप वळतात. यावर्षी येथील गणेश मंडळाच्या वतीने आयोध्यातील राम मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे. अयोध्येतील राम मंदिरासारखेच हुबेहूब मंदिर येथे आकार घेत अजून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. संत सावता महाराज मंदिर परिसरातील शंभर बाय तीनशे फूट आकारात हे मंदिर उभारले जात आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम त्याच बरोबर माता सीता, रामभक्त हनुमान व लक्ष्मण यांच्या मूर्ती विराजमान होणार आहेत.

याशिवाय मंदिर परिसरात 28 फुटी रामाची थ्रीडी मूर्ती व शेजारीच रामाला बोरं खाऊ घालताना शबरी साकारली जात आहे. सुमारे महिनाभरापासून पंधरा ते वीस कामगार या मंदिरासाठी रात्रंदिवस राबत आहे. येत्या 21 तारखेला मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून या मंदिराचा देखावा गणेश भक्तांसाठी खुला होणार आहे. जणू काही रांजणगाव (शेणपुंजी) येथे अयोध्याच अवतरली असल्याचा भास या देखाव्यावरून होणार असल्याने हे मंदिर सर्वांचे आकर्षण ठरणार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *