
वाळूज महानगर, (ता.15) – लंपी आजाराने बैलांचे आरोग्य धोक्यात असल्याने शासनाने घालून दिलेल्या अटीची पालन करत वाळूज परिसरातील विविध ठिकाणी गुरुवारी (ता.14) रोजी बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला.
बैलपोळा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मात्र यावर्षी लंपी आजाराने जनावरांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणाबाबत शासनाने अत्यंत कडक निर्बंध घातले होते. या निर्बंधाचे पालन करत अनेक शेतकर्यांनी आपापल्या गोठ्यात, घरासमोर व शेतात बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत बैलपोळा साजरा केला. परिसरातील तिसगाव, वडगाव, साजापूर, करोडी, घाणेगाव, जोगेश्वरी, वळदगाव, पंढरपूर येथे पोळ्याचा सण साजरा करण्यात आला. मात्र लंपी आजारामुळे या पोळ्यावर आनंदाचे विर्जन पडल्याचे दिसून आले.
तिसगाव येथे मिरवणूक –
वाळूज परिसरातील तिसगाव येथे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बैलांची गर्दी न होऊ देता मिरवणूक काढून बैलपोळा हा सण शांततेत साजरा करण्यात आला. या ठिकाणी माजी सरपंच विठ्ठलाल तरैयावाले व युवा मंचचे सहकारी मित्र यांनी एकत्र येत जास्त बैलांची गर्दी न होऊ देता मिरवणूक काढून शांततेत व मोठ्या उत्साहात बैलपोळा हा सण साजरा केला. यावेळी प्रा डॉ भरतसिंग सलामपुरे, तारासिंग तरयावाले, कुंदलाल तरैयावाले, अमृतसिंग सलामपुरे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
