
वाळूज महानगर, (ता.11) – बजाजनगर येथील अत्यंत गजबजलेल्या चौकात असलेले एचडीएफसी बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कट करून फोडले. मात्र यात किती पैसे चोरीला गेले ते अद्यापही गुलदस्त्यात आहे. ही चोरीची घटना सोमवारी (ता.11) रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील जय भवानी चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. या एटीएम मध्ये घुसून अज्ञात चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारून तसेच विद्युत पुरवठा खंडित करून एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने कट करून आतील रोख रक्कम लंपास केली. या एटीएम मशीन मध्ये किती रक्कम होती हे अद्यापही गुलदस्त्यात असून ते ऑडिट केल्यानंतरच उघड होणार आहे. सोमवारी (ता.11) रोजी पहाटे 2.45 ते 3 वाजेच्या दरम्यान म्हणजेच अवघ्या पंधरा मिनिटात ही चोरी झाली.
या प्रकरणी युरोनेट सर्व्हिस इंडिया प्रा.ली. चे एटीएम अधिकारी नितीन प्रल्हाद वाघमारे रा. गंगोत्री पार्क, वडगांव कोल्हाटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 380, 457 भादवि. प्रमाणे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाची पाहणी –
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात, चेकिंग अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस पोलीस उपनिरीक्षक सचिन पांगोटे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच चोरट्यांच्या मागावर पथके रवाना केली.
एकाच रात्री फोडले दोन एटीएम –
विशेष म्हणजे याच आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील सातारा व पिपळगाव बंसवत जिल्हा नाशिक येथील एटीएम फोडले आहेत. एटीएम फोडणारे आरोपी हे उत्तर भारतीय असण्याची शक्यता असून त्यांनी एटीएमच्या सिक्युरिटी यंत्रणेचा अभ्यास करून ही चोरी केली. गुन्ह्यात क्रियटा कार वापरलेली आहे. शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
