
वाळूज महानगर, (ता.10) – मराठा आरक्षणासाठी गेल्या कायगाव टोका येथे नऊ दिवसापासून सुरू असलेल्या देविदास पाठे यांच्या उपोषणाच्या नवव्या दिवशी प्रकृती खालावल्याने पाठे यांना रविवारी (ता.10) रोजी घाटीत दाखल केले असता, आमदार प्रशांत बंब हे भेटायला आले. यावेळी आमचे सांत्वन करू नका. ‘आधी आम्हाला आरक्षण द्या, नंतरच भेटायला या’ असा संतप्त सवाल तेथे उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांनी आमदार प्रशांत बंब यांना केला. 
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी तसेच विविध ठिकाणी उपोषण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका येथे देविदास पाठे हे उपोषण करत आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी रविवारी (ता.10) रोजी पाठे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. गेल्या नऊ दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे आमदार प्रशांत बंब यांनी ठुंकूनही पाहिले नाही.
मात्र पाठे यांची प्रकृती बिघडल्याचे समजताच आमदार प्रशांत बंब हे पाठे यांना भेटण्यासाठी घाटीत आले असता सकल मराठा समाजाचे समन्वयक भाऊसाहेब शेळके यांची आमदार बंब यांच्याबरोबर बाचाबाची होऊन ‘आधी आम्हाला आरक्षण द्या, तेव्हाच भेटायला या’ असा संतप्त सवाल केला. मराठा समाज आरक्षणासाठी जीव देत आहे. मात्र हे लोक प्रतिनिधी विधानसभेत प्रश्न मांडण्याऐवजी भेटायला येत आहे. आम्हाला त्यांच्या सांत्वनाची गरज नाही. असेही भाऊसाहेब शेळके म्हणाले.
