वाळूज महानगर, (ता.10) – अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज एकवटला असून सरकारला जाग आणण्यासाठी रविवारी (ता.10) रोजी शिवराई ते वाळूज दरम्यान काढण्यात आलेल्या थाळीनाद मोर्चाने वाळूज परिसर चांगलाच दणाणला. यावेळी एक मराठा, लाख मराठा. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे. अशा या घोषणा देत नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. हे उपोषण दडपून टाकण्यासाठी उपोषणार्थींवर लाठीहल्ला व गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे मराठा समाज एकवटला असून सर्वत्र राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या निषेधार्थ व जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ, मराठा आरक्षणासाठी वाळूज परिसरात रविवारी (ता.10) रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात आले. प्रथम शिवराई येथील हनुमान मंदिरापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या थाळीनाद मोर्चाला सुरुवात झाली.
थाळीनाद करत, विविध घोषणा देत हा मोर्चा शिवराई, लांझी रोड, वाळूज येथील मुख्य महामार्ग, मच्छी मार्केट, जीवन पाटणी प्रवेशद्वार, गणेश चौक मार्गे जाऊन झेंडा मैदानातील शिवाजी महाराजांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा पुन्हा त्याचमार्गे येऊन पोलीस ठाण्यात विसर्जित झाला. तेथे मोर्चेकर्यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्या नायक तहसीलदार गौरवकुमार खैरनार यांच्यासमोर मांडून त्यांना निवेदन दिले.
यावेळी मंडळ अधिकारी एस ए इथापे, कोतवाल अमोल खैरनार यांच्यासह वाळुज, शिवराई, पिंपरखेडा, लांझी, मेंधीपुर, लिंबेजळगांव, जिकठाण, बकवालनगर, नायगांव, रामराई, रामराईवाडी, शिवाजीनगर परिसर येथील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दरम्यान वाळूज वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्यासह वाळूज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढोले, पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजगुले, संदीप शेळके, पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ खोबरे, सुखदेव भागडे, कारभारी देवरे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.
