
वाळूज महानगर, (ता.9) – मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणावर लाठी हल्ला व गोळीबार केल्याने मराठा समाज एकवटला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासनाच्या निषेधार्थ व जरांगे पाटलाच्या समर्थनार्थ, मराठा आरक्षणासाठी वाळूज परिसरात रविवारी (ता.10) रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.
या संदर्भात वाळूज येथील भोंडवे पॅलेस येथे सकल मराठा समाजाच्यावतीने एका बैठकीचे आयोजन शनिवारी (ता.9) रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले होते. बैठकीत मराठा आरक्षणासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तसेच गंगापूर तालुक्यात विविध ठिकाणी उपोषणाला बसलेल्या मराठा समाज बांधवांना पाठींबा देण्यासाठी वाळूज परिसरात थाळीनाद आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. रविवारी (ता.10) रोजी सकाळी 10 वाजता शिवराई येथून सुरुवात होणार आहे. या आंदोलनात वाळुज, बजाजनगर, शिवराई, पिंपरखेडा, लांझी, मेंधीपुर, लिंबेजळगांव, बकवालनगर, नायगांव, रामराई, रामराईवाडी, शिवाजीनगर परिसर येथील सकल मराठा समाजातील बांधवानी हनुमान मंदिर, शिवराई येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
