March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.4) – मराठा समाजाच्या आरक्षण व इतर न्याय हक्कासाठी जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषणादरम्यान करण्यात आलेल्या लाठी हल्ल्याचा व गोळीबाराचा निषेध करत 

जोगेश्वरी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (ता.4) रोजी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून मृतदेह स्मशानभूमीत दहन केला.

यावेळी एक मराठा, लाख मराठाच्या जयघोषाने परिसर दणाणला होता. 

मराठा समाजाला आरक्षण तसेच इतर न्याय हक्कासाठी जरंगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू आहे. हे उपोषण सोडवण्यासाठी अनेक प्रयत्न केल्या गेले. मात्र त्याला जरंगे पाटील यांनी दाद दिली नाही. त्यामुळे पोलिसांकरवी उपोषणकर्त्यांवर लाठीहल्ला तसेच गोळीबार करण्यात आला. यात उपोषणकर्ते अनेक महिला, मुलं व तरुण जखमी झाले.

या घटनेचा राज्यभर निषेध करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जोगेश्वरी येथे सोमवारी (ता.4) रोजी सकाळी दहा वाजता गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढण्यात आली.

जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेली ही प्रतिकात्मक प्रेत यात्रा राज्य सरकारचा निषेध करत ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा देत स्मशानभूमीत गेली.

तेथे गृहमंत्र्याच्या प्रतिकात्मक मृतदेहाचे दहन करण्यात आले. एवढेच नव्हे तर राखेचा आणि दहाव्याचाही कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी श्रद्धांजलीपर बोलताना राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी मराठा समाजासह आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या इतर समाजाच्या नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *