वाळूज महानगर, (ता.2) – जालना जिल्हातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण उपोषण कर्त्यावर झालेल्या अमानुष हल्याचा निषेध व मराठा समाजाचा प्रलंबीत मागण्यांबाबत वाळूज येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढून वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना शनिवारी (ता.2) रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या भावना आपल्या मार्फत शासनाकडे पोहचवुन न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी करण्यात आली.
जालना जिल्हातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी काही समाज बांधव अमरण उपोषण आंदोलन करीत असलेल्या ठिकाणी रविवारी (ता.1) रोजी मराठा बांधवावर पोलीसांनी अमानुषपणे लाठीमार करून जखमी केले. त्याचा वाळुजगांव सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करण्यात येवुन या प्रकरणी लाठीमार करण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी केंद्रात व राज्यात भाजप आघाडीचेच सरकार असल्याने संसदेत अध्यादेश काढुन निर्णय घेण्यात यावा. आरक्षण सुप्रिम कोर्टात प्रलंबित असल्याचे कारण सांगुन समाजाची फसवणुक करू नये. मराठा समाजातील युवकांवर गंगापूर तालुक्यातील कायगांवसह इतर ठिकाणी दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी. समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित असलेला आण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी वाढवून देणे, सारथीचे सक्षमीकरणासह इतर 20 मागण्या तात्काळ मार्गी लावण्यात याव्या. अशी विनंती वजा मागणी सकल मराठा समाज वाळुज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने करण्यात आली.
यावेळी काकासाहेब चापेपाटील, रवि आढाव, गणेश देखकर, राजू जाधव, विश्वनाथ थोरात, महेश पवार, राहुल काळे, अरुण गायकवाड, अशोक उगले, सचिन पानकडे, शिवराज कंदलवाड, राजन तावरे, अशोक साखडे, दिपक थोरात, सचिन उगले, परमेश्वर पारधे, किशोर लंगोटे, ज्ञानेश्वर पवार, केदार देसाई, रोहित जाधव किरण तावरे, ऋतिक त्रिभुवन, करण गरड, ज्ञानेश्वर कंदलवाड, अनिकेत म्हस्के, उत्तम बनकर आदींची उपस्थिती होती.
पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारत दखल घेण्याचे आश्वासन दिले.
