
वाळूज महानगर, (ता.26) – एकाच कंपनीच्या व एकाच रंगाच्या सारख्याच दिसणाऱ्या दोन वेगवेगळ्या कार गाड्यांवर एकच क्रमांक टाकून ती वापरताना मिळून आल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी 6 लाख रुपये किमतीची एक इनोव्हा कार गाडी जप्त केली. ही कारवाई शनिवारी (ता.26) रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील ए एस क्लब जवळील तापडीया फ्लोरा सोसायटीत करण्यात आली. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (ता.26) रोजी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद नितनवरे व सहकारी पेट्रोलींग करत असतांना 11 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, ए एस क्लबजवळ, तापडीया प्लोरा सोसायटी रो हाऊस तिसगाव येथे दोन पाढऱ्या रंगाच्या इनोवा कार एक नंबर एक सिरीज असलेल्या उभ्या आहेत. त्यामुळे तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे एम एच 20, डी एफ -487 अशा क्रमांकाच्या एकच नंबर व एकच कंपनी असलेल्या 2 इनोवा कार दिसल्या, त्यावरुन खात्री केली असता या दोन्ही गाड्या उमेश वसंत नाईकवाडे वय 52, रा. रो हाऊस नं.6, तापडीया फ्लोरा सोसायटी, ए एस क्लब जवळ, तिसगांव यांच्या असल्याचे समजले. त्याला विचारपुस केली असता त्यांनी दोन्ही गाड्या त्याच्याच मालकीच्या असल्याचे सांगीतले. गाडीच्या कागदपत्राची पाहणी केली असता कागदपत्रावर दोन्ही गाड्यांचे चेसी व इंजिन नंबर वेगवेगळे होते. मात्र दोन्ही गाड्यांचा एकच क्रमांक होता. त्यामुळे आरटीओ कार्यालयाकडून माहिती काढली असता त्यातील एका इनोवा कारवर बनावट नंबर टाकल्याचे निष्पण झाले. त्यामुळे 6 लाख रुपये किमतीची एक इनोवा कारगाडी जप्त करण्यात आली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप शिंदे, पोना. धिरज काबलिये, विनोद नितनवरे, बाळु लहरे, पोअं.सुरज अग्रवाल, गणेश सागरे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली. या प्रकरणी पोलीस नाईक विनोद आसाराम नितनवरे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी उमेश वसंत नाईकवाडे वय 52, रा. रोहाऊस नं.6, तापडीया फ्लोरा सोसायटी रोहाऊस ए एस क्लब जवळ, तिसगांव याच्या विरुद्ध कलम 420, 465 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. अशोक इंगोले करत आहेत.
