
वाळूज महानगर, (ता.25) – एटीएम कार्डाची आदलाबदली करून आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली, मात्र वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एका उपनिरीक्षकाने या महिलेचे समाधान करून न्याय मिळवून देण्याऐवजी उलट तिला ठाण्यातच फाशी घेण्याचा अजब सल्ला दिला. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की रांजणगाव (शेणपुंजी) येथील चौत्रा अंकुश रेखाडगेवाड या 7 जुलै रोजी गावातीलच सावता महाराज मंदिराजवळील एसबीआय बँकेच्या एटीम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तेथे एका चाळीस वर्षीय इसमाने तिला दहा हजार रुपये काढून दिले. त्यानंतर त्याने हातचलाखी करून एटीएम कार्डाची आदलाबदली करून
दुसरेच कार्ड दिले.
दरम्यान, त्या भामट्याने चैत्रा रेखाडगेवाड यांच्या एटीएम कार्डच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या एटीएम मधून रेखाडगेवाड यांच्या खात्यातील शिल्लक असलेले सर्वच 2 लाख 90 हजार रुपये काढून घेऊन खाते रिकामे केले. दरम्यानच्या काळात चौत्रा ही परभणी येथे गावी गेली. तेथे कार्डमधून पैसे काढण्यास गेली असता पैसे निघत नव्हते. त्यामुळे एटीएम कार्डची पाहणी केली असता, हे कार्ड नरवडे यांच्या नावाचे असल्याचे दिसून आले. फसवणुक आल्याचे लक्षात येताच त्यांनी बँकेत तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 
पोलिसांचा अजब सल्ला –
वीस वर्षे काबाकष्ट करून जमा केलेली रक्कम गेल्याने हवालदिल झालेल्या महिलने पैसे परत मिळावे. यासाठी पोलीस ठाण्यात दोन महिने चकरा मारल्या. मात्र पैसे मिळवून देण्यासाठी तपास करण्याऐवजी उलट महिलेलाच दमदाटी करत चालढकल केली. या महिलेच्या म्हणण्यानुसार ‘साहेब माझे सर्व पैसे गेले, आता मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही’ असे म्हणाली असता पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी सदर मोहिलेला म्हणाले की, ‘आत्महत्या करायचीच असेल, तर येथेच कर’, ‘दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे’. असा. अजब सल्ला दिल्याचे तिने सांगितले.
