March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.24) – वाळूज परिसरातील साउथ सिटी सिडको वाळूज महानगर -2 येथील नागरिकांना सोयी सुविधा न देता विकासक कंपनीने गाषा गुंडाळल्याने संतप्त नागरिकांनी बुधवारी (ता.23) रोजी सिडको कार्यालयासमोर उपोषण केले. दरम्यान रेखांकन प्रस्ताव दाखल केल्यानंतर पूर्ण करावयाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून सिडकोच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी मे. युनिटेक लिमिटेड कंपनीच्या तिघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तीसगाव येथील गट क्रमांक 114 ते 117 मधील सिडको वाळुज महानगर 2, साऊथ सिटी, छत्रपती संभाजीनगर येथे 1999 मध्ये दिल्ली येथील मे. युनिटेक लिमिटेड कंपनीने सिडको कार्यालयास रेखाकंन प्रस्ताव सादर केला होता. तेथील भूखंड विक्री केले. मात्र नियमाप्रमाणे त्यांनी मुलभूत सेवा सुविधा, मलनि:सारण वाहिनी, जलवाहिनी व पाऊस यासाठी गटार आदी सुविधा पुर्ण केल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वीस वर्षापासून येथील नागरिक विविध नागरी समस्यांचा सामना करत आहे. वारंवार अर्ज व निवेदने देऊनही सिडको प्रशासन दखल घेत नसल्याने येथील नागरिक त्रस्त आहेत.

सुविधा न देता हस्तांतरित

मे. युनिटेक कंपनीने सिडकोच्या परवानगीनुसार भूखंडाची विक्री केली. त्यानंतर भूखंड खरेदी करणाऱ्या नागरिकांनी तेथे घरं बांधली. परंतु या भागाचा विकासक असलेल्या युनिटेक कंपनीने ड्रेनेजलाईन, जलवाहिनी, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था तसेच विविध सुविधा न पुरविता हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला.

नागरिकांची न्यायालयात धाव
येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी सिडकोकडे वारंवार अर्ज, निवेदन दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने साऊथ सिटीतील नागरिकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे व विविध सुविधा पुरविण्याचे निर्देश सिडकोला दिले.

उपोषण सुरू होताच गुन्हा

न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा सिडको प्रशासनाने साउथ सिटी येथील नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर येथील नागरिकांनी बुधवारी (ता.23) रोजी सिडको कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. परिणामी सिडको प्रशासनाचे धाबे दणाणले. या प्रकरणी सिडकोच्या सहायक वसाहत अधिकारी अस्मिता तेजराव विर्शीद यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद शिराडोणकर, तरुण कोटक व एस.जोहर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम 1966 कलम 52 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डाके करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *