March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – वाळूज परिसरातील वडगाव (को) येथील नागनाथ मंदिरात गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडितपणे नागपंचमी महोत्सवाचे आयोजन करण्यात येऊन चोरडिया परिवाराच्या वतीने अन्नदान करण्यात येते. यावेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांंची मोठी गर्दी होते. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (ता.21) रोजी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या ज्योती चोरडिया यांच्या वतीने भगवान नागनाथ मंदिरात अभिषेक व महापूजा करण्यात आली.

यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागपंचमी आली. नागपंचमी व श्रावणी सोमवार हा योग अनेक वर्षानंतर जुळून आला. नागपंचमी महोत्सव निमित्त चोरडिया परिवाराच्या वतीने नागनाथ मंदिर अभिषेक व महापूजा करण्यात आली. यावेळी गव्हाची खीर व पुरणाचा नैवेद्य दाखविण्यात आला. यावेळी महिलांची नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागनाथ मंदिरात मोठी गर्दी केली होती.

नागदेवतेला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा केली. याप्रसंगी प्रवचन करताना ह .भ .प. भाऊसाहेब महाराज वाघाडे यांनी नागदेवतेच्या पूजनाने कालसर्प व सर्प दोषाचा प्रभाव दूर होतो. तसेच सर्पयोनीत गेलेल्या पितरांना नागपंचमी पूजेमुळे मुक्ती मिळते. व कुटुंबात सर्पभय राहत नसल्याचे सांगितले. प्रवचनानंतर भाविकांना चोरडिया परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *