March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.28) – दुचाकीवर जाणाऱ्या दोघांचा तीन अनोळखी चोरट्यांनी पल्सर दुचाकीवरून पाठलाग करत दुचाकी आडवी लावून चाकूचा धाक दाखवून व मारहाण करत जवळजवळ 53 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला. ही वाटमारी मंगळवारी (ता.26) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिकठाण शिवारात झाली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कपिल नानासाहेब कांबळे वय 33 वर्ष रा.सैनिकनगर भिंगार, ता. जि. नगर व त्यांचा मेव्हणा अविनाश अडागळे असे दोघे होंडा शाईन दुचाकी (एम एच 16, बीक्यु-4858) वर बसून जालनाकडून नगर येथे घरी जात असताना तीन ओळखी आरोपीतांनी विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरुन कांबळे व आडागळे यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. तसेच दुचाकी आडवी लावुन कपिल कांबळे यास कंबरेच्या बेल्टने मारून जखमी केले व हातातील चाकू गळ्यावर ठेवून धाक दाखवून दुचाकी तसेच रोख रक्कम व कागदपत्रे असलेली कपड्याची बॅग बळजबरीने हिसकावुन दुचाकीसह पळून गेले. बुधवारी (ता.26) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवरील दत्तप्रसाद हॉटेलच्या समोर, एच पी पेट्रोल पंप जिकठाण शिवार येथे झालेल्या या वाट मारीत आरोपींनी रोख एक हजार रुपये, आधार कार्ड, सुरक्षा रक्षक मंडळाची ऑर्डर, पॅन कार्ड, दोन चार्जर, हेडफोन, दोन बेडशीट, एक लाल रंगाची चादर, जीन्स पॅन्ट, हिरवा रंगाचा बेल्ट, काळी पॅन्ट, पांढरा शर्ट, एक रेनकोट गुलाबी रंगाचा, काळ्या रंगाचे बूट असा एकुण 53 हजार रुपयाचा ऐवज लुटण्यात आला याप्रकरणी कपिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात कलम 394, 341, 34 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजगुले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *