March 24, 2026

वाळूज महानगर, (ता.27) – अपहरणाच्या कारणावरून वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे झालेल्या गोळीबारानंतर गुन्हे शाखा व वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ रवाना केलेल्या एका पथकास 40 वर्षीय इसम देशी कट्टा जवळ पाळताना मिळून आला. पोलिसांनी तो जप्त करून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (ता.27) रोजी दुपारी एकलहेरा येथील चव्हाण वस्तीवर करण्यात आली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील रांजणगांव (शे.पु.) येथील सावता माळी मंदीराजवळ मंगळवारी (ता.25) रोजी रात्री 11.45 वाजता झालेल्या गोळीबारातील आरोपीचा शोध घेत गुन्हेगार वस्ती चेक करतांना गुरुवारी (ता.27) रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास एकलहरा येथील चव्हाण वस्तीवरुन एक इसम पळून जात असतांना दिसला. त्याचा पाठलाग करून पकडून नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव ज्ञानेश्वर रावसाहेब पिंपळे वय 40 वर्ष रा.कायगाव ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र (देशी कट्टा ) मिळून आला. त्याला त्याबाबत विचारणा केली असता त्याने काही एक योग्य उत्तर दिले नाही. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे पोउपनि संदीप शिंदे यांनी ज्ञानेश्वर पिंपळे याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र (देशी कट्टा ) चॉकलेटी रंगाची मुट, व स्टिल बॉडी व रिकाम्या मॅगझीनसह जप्त केला. आरोपी पिंपळे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरूध्द कलम 3,25 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगीरी पोलीस आयुक्त मनोज लोहीया, पोलीस उप आयुक्त दिपक गि-हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, सपोनि गौतम वावळे, पोउपनि संदीप शिंदे, पोलीस अंमलदार अविनाश ढगे, यशवंत गोबाडे, सुरेश भिसे तसेच गुन्हे शाखेचे पोउपनि प्रविण वाघ, योगेश नवसारे, नितीन देशमुख, मंगेश हरणे, धर्मराज गायकवाड, विजय घुगे, दादाराव झारगड यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *