
वाळूजमहानगर, (ता.25) – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढल्याचे चित्र आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील अवैध व्यवसायाचा मुद्दा आता अधिवेशनात गाजत असल्याने अवैध धंदे चालकांचे त्यांना पाठबळ देणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून वाळूज महानगर परिसरात मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून शहरात 70 टक्के गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. या अवैध व्यवसायांना पोलिसांचं संरक्षण आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. येथील वाढत असलेल्या गुन्हेगारी व अवैध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी अंबादास दानवे यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच अवैध व्यवसायधारकांकडून कशाप्रकारे वसुली केली जाते त्याची फोन नंबरसहित यादीच दानवे यांनी सभापती यांच्याकडे सुपूर्द केली. ज्या भागात जुगार सुरू आहे तेथे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. शहरात जुगाराचे पैसे पाठविण्यासाठी ठिकठिकाणी क्यू आर कोड लावले असल्याची माहितीही दानवे यांनी सभागृहात दिली. या अवैध व्यवसायाला पोलीस आयुक्तालय कार्यालयातून संरक्षण दिल जातं. जुगार, मुरूम, वाळू तस्करी या गुन्हेगारांना बोलावून एक पोलीस अधिकारी पैसे वाढवून देण्यास सांगतो. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
दानवेंच्या प्रश्नाला फडणवीसांचे उत्तर –
दरम्यान दानवे यांनी केलेल्या गंभीर आरोपीची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटले की, विरोधी पक्षनेते यांनी सादर केलेल्या यादीतील फोन नंबर तपासले जातील. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. संपूर्ण चौकशी केली जाईल, असे फडणवीस म्हणाले.
पोलिसांचा वचक नाही –
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरासह वाळूज परिसरातील अवैध धंदे मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. उघडपणे नशेच्या गोळ्या मिळत असल्याने तरुण त्याच्या आहारी जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. काही भागात गुंडगिरी टोळक्यांची दहशत पाहायला मिळत आहे. अनेक भागात जुगार अड्डे चालत आहे. पोलीस यांचा वचक राहिलेला नाही. पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यापूर्वीच दानवे यांनी केला होता.
