
वाळूजमहानगर, (ता 22) – वाळुज जवळील शिवराई शिवारात शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी दहशतीखाली आहे. या बिबट्याच्या भीतीने शेतकरी, कामगार व मजूर कामावर येत नसल्याने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी परिसरातून होत आहे.
टेंभापुरी मध्यम प्रकल्पामुळे शिवराई गावाचे पुनर्वसन वाळूजजवळ झाले आहे. त्यामुळे टेंभापुरी धरणाचा विस्तीर्ण परिसर आहे. टेंभापुरी धरणात मुबलक पाणी असल्याने परिसरातील पाणी पातळी चांगली असल्याने या परिसरात बागायती शेती मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहे. त्यामुळे या परिसरात रानडुक्करं, तडस अशा वन्य प्राण्यांचा सुळसुळाट दिसून येतो. परिसरात लहान-मोठे उद्योजक असून हळूहळू औद्योगिक वसाहतीचा परिसर वाढत आहे. त्यामुळे या परिसरात कारखानेही आहेत.
शनिवारी (ता.22) रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास याच परिसरातील हरहर प्लास्टिक कंपनीतील कामगार चारचाकी वाहनातून वाळूजकडे येत होते. त्याचवेळी शिवराई शिवारातील गट क्रमांक 37 मधील चिकूच्या बागेतून अचानक एक बिबट्या रस्त्यावर आला. त्यामुळे कामगारांची पाचावर धारण बसली. मात्र आपल्याला चारचाकी वाहनाची सुरक्षा आहे. असे लक्षात येतात त्यांनी थबकत थबकत चारचाकी वाहनातून या बिबट्याचे अत्यंत जवळून फोटो व व्हिडिओ काढले.
शेतकऱ्यांना केले सावध –
शिवराई परिसरात बिबट्या आल्याची माहिती कृष्णा सुभाष साबळे वय 35 रा. शिवराई यांनी गावात तसेच वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना देऊन त्यांना सावध केले. दरम्यान वाळूज परिसरातील अनेकांनी शेत वस्तीवर राहणाऱ्यांना फोन करून बिबट्याची माहिती देत काळजी घेण्यास सांगितले. ही माहिती वाऱ्यासारखी पसरतात अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या शेळ्या मेंढ्या लहान वासरू गाई म्हशी सुरक्षित रित्या गोठ्यात बांधल्या. मात्र या बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकरी, कामगार व मजूर दास्तावले असून कोणीही शेतात जाण्यास तयार नाही.
बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा –
सध्या शेतात पिके जोमाने वाढत असून या पिकाला पाणी देणे, फवारणी करणे. याशिवाय निंदणी, खुरपणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शंकर गवळी, बाबासाहेब शिंदे, नाथा शेळके, कृष्णा साबळे, शंकर कुंजर, भगवान पाटील, पांडुरंग जाधव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
