
वाळूजमहानगर, (ता 22) – भरधाव जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही दुचाकींचा चुराडा होऊन दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी होऊन दोन ठार झाले. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगर या कामगार वसाहतीतील महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री 10:50 वाजेच्या सुमारास झाला. 
याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारा संजय रामदास बोरुडे वय 25 वर्ष व त्याचा मित्र कल्याण प्रभाकर मानकापे हे दोघे स्प्लेंडर दुचाकी (एम एच 20, जी जे- 6025) वरुन कामगार चौकाकडून दुचाकीवर येत होते. तर एक अनोळखी तरुण हिरो होंडा दुचाकी (एम एच 20, ए एम – 91 17) वर विरुद्ध दिशेने येत होता.
भरधाव असलेल्या या दोन्ही दुचाकी समोरासमोर जोरात धडकल्या. शुक्रवारी (ता.21) रोजी रात्री 10:50 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकात झालेल्या या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा होऊन दोन्ही दुचाकीवरील तीनही जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना उपचारार्थ घाटीत दाखल करून दोन्ही वाहने ताब्यात घेतले. दरम्यान उपचार सुरू असताना संजय बोरुडे रा. दत्तनगर, रांजणगाव व अन्य दुचाकीवरील एक अनोळखी असे दोन जण ठार झाले.
तर कल्याण प्रभाकर मानकापे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ करीत आहे.
