
वाळूजमहानगर, (ता.19) – विहिरीवरील विद्युत पंप चालू करत असताना स्विच बोर्डात करंट उतरल्याने विजेचा शॉक लागून 60 वर्षीय शेतकऱ्याचा बुधवारी (ता.19) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शेंदूरवादा परिसरातील मुर्शिदाबाद (भगतवाडी) येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उत्तम रामभाऊ म्हस्के (60) यांची मुर्शिदाबाद गावालगतच गुरुधानोरा शिवारात गट क्र.109 मध्ये शेतजमीन आहे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी म्हस्के बुधवारी (ता.19) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास विहिरीवर असलेला विद्युत पंप सुरु करण्यासाठी गेले असता अचानक स्वीच बोर्डामध्ये विद्युत प्रवाह (करंट) उरल्याने उत्तम म्हस्के यांना विजेचा शॉक लागल्याने ते बेशुद्ध झाले. शेजारील शेतकरी सुभाष पाठे यांना ही घटना कळताच त्यांनी म्हस्के यांच्या घरी माहिती देऊन तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उत्तम म्हके यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे शेंदूरवादा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
