March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.16) – मसिआ शिष्टमंडळाने अध्यक्ष अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती हाय टेक टेक्स्टाइल पार्क प्रा. लि. येथे अभ्यास दौरा आयोजित केला. अभ्यास दौऱ्यानंतर मसिआच्या शिष्टमंडळाने बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनला देखील सदिच्छा भेट देवून उद्योगांच्या विविध समस्या व त्यावर उपाय यावर सविस्तर चर्चा केली.

या अभ्यास दौर्या अंतर्गत बारामती हायटेक टेक्स्टाइल पार्क प्रा. लि. येथे भेट दिली. यावेळी संपूर्ण टेक्स्टाइल पार्कची सहभागी सदस्यांनी अभ्यासपूर्ण पाहणी केली. यावेळी टेक्स्टाइलचे अनिल वाघ यांनी सविस्तर माहिती देवून सहभागी सदस्यांच्या शंकाचे निरसन देखील केले. टेक्स्टाइल पार्क बरोबर मसिआच्या शिष्टमंडळाने यावेळी कॉटन किंग, पेपर मिंट, स्वराज फर्निचर हब या कंपन्यांना भेट दिली. आज उद्योजकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. यात प्रामुख्याने जीएसटी वसूली, अवाजवी वीज दरवाढ, ग्रामपंचायत कर, कुशल मनुष्य बळाची कमतरता, अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव, कायदा व सुव्यवस्था अशा विविध समस्या महाराष्ट्रातील सर्व उद्योगांना भेडसावत असतात. शासन दरबारी हा प्रश्न आपल्या आपल्या पद्धतीने सर्व संघटना मांडत असतात आणि ते प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न देखील करतात. परंतु पाहिजे तसा प्रभाव पडत नाही, किंवा उद्योजकांना हवा असलेला न्याय मिळत नाही. त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन सोबत बैठकीत बोलताना व्यक्त केले. ही बैठक अत्यंत सकारात्मक झाल्याचे मत यावेळी मसिआच्या शिष्टमंडळाने व्यक्त केले. यावेळी बारामती इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट सदस्य महादेव गायकवाड, मनोहर गावडे, कॉटन किंगचे प्रकल्प प्रमुख खंडोजी गायकवाड, टेक्स्टाइल पार्कचे अनिल वाघ, उद्योजक आशीष पलोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीसाठी मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर पाटील व राजेंद्र चौधरी, सहसचिव सर्जेराव साळुंके, कोषाध्यक्ष सुरेश खिल्लारे, कार्यकारिणी सदस्य राहुल मोगले, प्रल्हाद गायकवाड, शरद चोपडे, सलिल पेंडसे यांच्यासह उद्योजक दिलीप चौधरी, अनिल जाधव, उदय देशमुख आदींचा मसिआच्या शिष्टमंडळामध्ये समावेश होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *