
वाळूजमहानगर, (ता.4) – औद्योगिक वसाहतीसह वाळूज येथे मोठी बाजारपेठ असल्याने अत्यंत वर्दळीच्या अशा वाळूज ते लांझी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे पडल्याने त्यात पाणी साचून रस्त्यावर चिखलचचिखल झाला आहे. त्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांसह व्यापारी व वाहन धारक चांगलेच त्रस्त झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नसल्याची भावना व्यक्त होत आहे. 
वाळूज हा औद्योगिक वसाहतीचा भाग असल्याने परिसरातील नारायणपूर, शेंदुरवादा, सावखेडा, पिंपरखेडा, लांझी, हिरापूर, शिवराई, गाडेगाव व पुढे रांजणगाव तसेच पैठणकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून रात्रंदिवस मोठी वर्दळ असते. शिवाय वाळूज औद्योगिक वसाहतीत परिसरातील अनेक गावचे तरुण, बेरोजगार नियमितपणे कंपन्यांमध्ये कामास ये-जा करतात. तसेच अनेक मुले, मुली शाळा, महाविद्यालयासह उच्च शिक्षणासाठी वाळूज महानगरासह छत्रपती संभाजीनगर येथे नियमितपणे येतात. मात्र वाळूज ते लांझी या रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्याने चालताना मुलांसह वाहनचालकांना मात्र जीव मुठीत धरून जावे लागते. रस्त्यात जागोजागी खडी उखडली असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. खड्डे वाचवताना अनेकदा अपघात झाले. एवढेच नाहीतर या रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात होत आहे. दररोज होणाऱ्या अपघातांनी नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसंदर्भात अनेकदा निवेदने, आंदोलन केली. मात्र याचा काहीही फायदा झाला नाही. आता नागरिक कंटाळले आहेत. तालुक्याचे नेते मोठमोठे भाषणे देत लाखो, करोडोच्या गप्पा मारतात. आश्वासनाची खैरात करतात. प्रत्यक्ष मात्र कामाचा पत्ताच नसतो. त्यामुळे थेट रस्त्यावर उतरल्याशिवाय रस्त्याचे काम होणार नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 
आंदोलनाशिवाय पर्याय नाही
प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की, या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचते. त्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांसह वाहनधारकांची तारांबळ होते. अनेक वेळा मागणी करूनही या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्या जाते. फक्त मतदानासाठीच वाळूजकरांचा वापर करून घेतला जातो. त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
– संदीप तुपे, माजी ग्रा. पं. सदस्य, वाळूज
