वाळूजमहानगर, (ता.30) – टाळ, मृदंगाच्या व हरिनामाच्या जयघोषात लाखो भाविक आषाढी एकादशीनिमित्त छोट्या पंढरपुरात दाखल झाल्याने विठू माऊलीच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता. बुधवारी मध्यरात्रीपासूनच विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातुन आले
ल्या शेकडो दिंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी (ता.29) प्रति पंढरपूरातील विठूरायाचे दर्शन घेतले.
मराठवाड्यातील प्रति पंढरपूरात आषाढी एकादशी निमीत्त गुरूवारी (ता.29) पहाटेपासून विठ्ठल-रुख्मीनी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. वारकरी तसेच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पांडूरंगाच्या दर्शनासाठी शहर व परिसरातील शेकडो दिंड्या प्रति पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, नगर, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यासह लाखो भाविकांनी प्रति पंढरपूरातील विठूरायाचे दर्शन घेतले. 
प्रथम मध्यरात्री पालकमंत्री संदीपान भुमरे, पुष्पाताई भुमरे तसेच विलास बापू भुमरे व वर्षाताई भुमरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलरखुमाईचा अभिषेक करण्यात आला. तसेच पहाटे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या हस्ते सपत्नीक पाद्यपूजन करण्यात आले. दरम्यान पोलिस आयुक्त मनोज लोहीया यांनीही विठ्ठलचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समीतीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, आपासाहेब झळके, रत्नाकर शिंदे, हरिश साबळे, पुष्पा झळके, पंढरपूरच्या सरपंच वैशाली राऊत, रोहीत राऊत, हरिभाऊ शेळके, बंकटलाल जैस्वाल, दिगंबर साबळे, शहाजी कुंदे, लक्ष्मण वाघमारे, मच्छिंद्र झळके, महेंद्र खोतकर, माजी पंचायत समिती सदस्य गणेश नवले यांच्यासह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान विठूरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना सुलभ रीतीने दर्शन व्हावे याकरिता तिरंगा चौक ते विठ्ठल रुक्माई मंदिरापर्यंत मुख्य रस्त्यावर लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. दरम्यान मंदिर प्रांगणात नागमोडी पद्धतीने दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती.
दिंडीतील वारकऱ्यांना गर्दीचा त्रास होऊ नये, त्यांना सहज दर्शन घेता यावे, याकरिता मंदिर संस्थान व पोलीस प्रशासनाने दिंड्यांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था केली होती. मंदिराच्या सभागृहातून दिंडीतील वारकऱ्यांना विठुरायाचे सहज दर्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. सुमारे
पंधरा लाख भाविकांनी प्रति पंढरपूरातील विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मंत्र्यांसह राजकीय नेतेही विठ्ठलचरणी –
आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार किशन तनवाणी, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, बाळासाहेब गायकवाड, अरविंद धीवर आदी नेत्यांनी प्रति पंढरपूरातील विठुरायांचे दर्शन घेतले.
अलोट गर्दीमुळे कोलमडले नियोजन –
आषाढी एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने गृहीत धरलेल्या भाविकांच्या संखेत अनेक पटीने वाढ झाल्याने मंदिर परिसरात दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे अनेकांना गुदमरल्यासारखे झाले. परिणामी भाविकांनी गर्दीतून काढता पाय घेण्यासाठी लोखंडी जाळ्या तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक महिला भाविक या जाळ्यात अडकल्या होत्या. त्यातून सावरण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले.
गर्दीच्या तुलनेत रस्ते अपुरे –
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या गर्दीच्या तुलनेत येथील रस्ते अपुरे पडले होते. त्यामुळे गल्लीबोळातून रस्ता शोधताना भाविक दिसून आले.
सिडको प्रशासनाची उदासीनता –
वाळूज औद्योगिक वसाहतीमुळे परिसरातील लोकसंख्या व नागरी वसाहती वाढत आहे. या परिसरात सिडकोच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ते वाळूज दरम्यान सर्विस रोड नियोजित आहे. हा सर्विस रोड अनेक ठिकाणी रखडला. तो करण्यास सिडको उदासीन असल्याने या परिसरात रस्त्या अभावी अनेकांची कुचंबना होत आहे. त्याचा प्रत्यय आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांना आला.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त –
यात्रेदरम्यान पोलीस आयुक्त अशोक थोरात, गुन्हेशाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, एमआयडीसी वाळूजचे पोलिस निरीक्षक अविनाशआघाव, वाळूजचे गिता बागवडे, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, सातारा पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्यासह इतर पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त होता. तसेच यात्रेतील प्रत्येकावर नजर ठेवण्यासाठी सुमारे पंच्चेचाळीस सीसीटीव्ही कॅमेर्यांसह ड्रोन कॅमेरे लावण्यात आले होते.
आरोग्य विभागाचे पथक दक्ष –
दरम्यान आरोग्य विभागाचे डॉ. परमेश्वर, डॉ. शुभांगी जगताप, डॉ. अमोल जयस्वाल, डॉ. शंकर देशपांडे, डॉ. ऐश्वर्या खेडकर, डॉ. मुक्ता गिरी, पर्यवेक्षक दिनेश वैष्णव, आरोग्य सेवक सुशांत बिडकर, राहुल कोठुळे, राहुल इंगळे, बेबीताई शिंदे व डॉ. महादेव संकपाळ यांचे पथकही यावेळी यात्रेतील भाविकांसाठी सज्ज होते.
भाविकांसाठी विविध स्टाॅल –
प्रति पंढरपूरात दर्शनाला जाणार्या भाविकांसाठी विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने पाणी, चहा, फळ आणि फराळाचे वाटप करण्याचे जागोजागी स्टाॅल लावण्यात आले होते.
