March 24, 2026


वाळूजमहानगर, (ता.28) – केबिनचा चक्काचूर झाल्यानंतरही जीव धोक्यात घालून अत्यंत जोखमीचा प्रवास करणाऱ्या ट्रक चालकाकडे अनेकांचे लक्ष लागल्याचे मंगळवारी (ता.27) रोजी दिसून आले. हे दृश्य पाहून चालक धोक्यात की ट्रक. असा प्रश्न अनेकांना पडल्याशिवाय राहिला नाही. या ट्रक चालकास कोणीही न हटकल्याने तो सरळ पोलीस ठाण्यासमोरून बिनदिक्कतपणे निघून गेला.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी (ता.27) रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास पंढरपूरकडून वाळूज मार्गे गंगापूरच्या दिशेने एक मालवाहतूक करणारा ट्रक गेला. कंटेनर वजा असलेल्या या ट्रकच्या केबिनचा संपूर्ण चक्काचूर झालेला होता. त्यामुळे समोर फक्त ट्रक चालवताना चालकच दिसत होता. त्याचा हा प्रवास अत्यंत धोकादायक व अपघातास कारणीभूत ठरणारा होता. असे असूनही हा ट्रकचालक बिनदिक्कतपणे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरून गंगापूरचे दिशेने निघून गेला. एरवी सीट बेल्ट नसला की पोलीस थांबवतात, नंबर प्लेट नसली की वाहन थांबवतात, एवढेच नव्हे तर वाहतुकीचा लहानातलालहान नियम लावून वाहनधारकांना दंड भरण्यास सांगतात. हे अत्यंत योग्य आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. मात्र मंगळवारी (ता.27) रोजी अत्यंत धोकादायक व भयानक अवस्थेत ट्रक जात होता. याकडे ना आरटीओचे, ना वाहतूक शाखेचे किंवा ना स्थानिक पोलिसांचे लक्ष गेले. त्यामुळे हा ट्रक चालक बिनधास्तपणे व सुसाट वेगात निघून गेला. हे दृश्य पाहण्याचा अनेकांना मोह आवरता आला नाही. त्यामुळे या ट्रककडे अनेकांचे लक्ष लागले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *