वाळूज महानगर, (ता.26) – रस्त्याने पायी जाणार्या एका इसमाला दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी रस्त्यात अडवून त्याच्या खिशातील पॉकेट पॉकेट व 23 हजार रुपये किमतीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. ही घटना शनिवारी (ता.24) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील वैष्णोदेवी गार्डन रोडवर घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शंकरसिंग ईश्वरसिंग गौर हा कामगार शनिवारी (ता.24) रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीतील वैष्णोदेवी गार्डन रोडवरुन पायी जात होता. त्यावेळी भुरभुर पाऊस सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्याचवेळी एका दुचाकीवर दोन भामटे आले. त्यांनी शंकरसिंग गौर याला दमदाटी करून त्याच्या खिशातून बळजबरीने पाकिट काढून घेतले. तसेच हातातील 23 हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पोबारा केला. दिवसेंदिवस एमआयडीसी वाळूज परिसरात वाढत असलेल्या लुटमारीच्या आणि चोरीच्या घटनांमुळे कामगार वर्गात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.
