
वाळूजमहानगर, (ता.24) – पुणे व छत्रपती संभाजीनगर, वाळूज येथील कंपनीसाठी गुजरातच्या एका कारखानदाराचा विश्वास संपादन करून खरेदी केलेल्या कच्च्या मालाचे पैसे न देता 4 कोटी 84 लाख 58 हजार 939 रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी ता.23) रोजी उघडकीस आला. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुजरात राज्यातील वलसाड येथील रोनक हर्षद कटारिया हा शिक्षण घेत असताना त्याच्याबरोबर स्वरित शिषीर श्रीवास्तव (वय 32) व शुभम शिषीर श्रीवास्तव या दोन्ही भावांची ओळख झाली. कटारिया याने क्रुडीएम नावाने प्रोप्रायटरशिप सुरू करून त्याच्या माध्यमातून इम्पोर्टेड प्लॉस्टीक ग्रॅन्युल (रेजीन) मटेरियल आयात करुन तो देशभर विक्री करत होता. श्रीवास्तव या दोन्ही भावांनी पुणे येथे त्यांची स्पार्क प्लास्टोमेट इंडिया प्राइवेट लिमिटेड ही प्लास्टिक वस्तू बनविणारी कंपनी असल्याचे सांगितले या कंपनीसाठी दोन्ही भावांनी कटारिया याच्याकडून वेळोवेळी कच्चा माल घेतला. त्यानंतर त्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील रिध्दी इंडस्ट्रीज व वेदांत एन्टरप्राजेस, प्लॉट नं. बी-46 या कंपनीसाठीही 4 कोटी 84 लाख 58 हजार 939 रुपयाचा कच्चामाल खरेदी केला. व जाणूनबुजून खोटे बोलून बँकेत पुरेसे पैसे नसतानाही धनादेश देऊन विश्वासघात केला. त्यानंतर दोन्ही भावांनी कंपनी बंद करून घर सोडून कुठेतरी निघून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रोनक हर्षद कटारिया यांनी गुरुवारी (ता.22) दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जारवाल करीत आहे.
