वाळूज महानगर, (ता.23) – आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशीच असल्याने सामाजिक एकता अबाधित राहावी, म्हणून मुस्लीम बांधवांनी बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले होते. त्यास सहमती देत मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देण्याचा व दुसऱ्या दिवशी बकरी ईद साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे आषाढी एकादशीला येणाऱ्या भाविकांचे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करणार आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या वतीने आगामी बकरी ईद व आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुर येथील श्री. विठ्ठल रुख्मिणी मंदिर, पंढरपूर येथे गुरुवारी (ता.22) बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलेल्या आवाहना बाबत चर्चा करण्यात आली. त्यास उपस्थीत मुस्लीम समाजाचे मुफ्ती मौलाना व धर्मगुरु व मुस्लीम बांधव यांनी प्रतिसाद देत बकरी ईद गुरुवारी (ता.29) ऐवजी शुक्रवारी (ता.30) रोजी साजरी करण्याचे एक मताने मान्य केले. तसेच शुक्रवारी नमाजाचे वेळी सर्व धर्मगुरु यांचेतर्फे आप-आपले मस्जिद मध्ये आवाहन करण्यात येणार आहे व बकरी ईदच्या दिवशी आषाढी एकादशी निमीत्त पंढरपूर येथे भरणारे यात्रेत येणारे वारकरी व भावीक यांना आवश्यक ती साधनसामृग्री उपलब्ध करुन त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर हे अतिसंवेदनशील शहर असुनही मुस्लीम समाजाच्या या अनोख्या निर्णयामुळे अनोखा पायंडा पाडला आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र व भारतात सामाजिक सलोख्याचा अनोखा निर्णय पंढरपूर येथील मुस्लीम बांधवांनी पोहचविण्याचा प्रयत्न करुन एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. ही बैठक पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांचे अध्यक्षतेत घेण्यात आली. बैठकीस पंढरपूर येथील श्री. विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष आप्पासाहेब झळके व जामा मस्जिदचे महेबुब चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अख्तर शेख, शहेबाज चौधरी, रोशन शहा, शेख जावेद,
अक्रम पटेल, आमेर पठाण, मौलाना आमीरसाब सलीम पटेल, शेख जावेद, कारी अब्दुल रशीद साब, आफीज मुस्ताक, मुफ्ती अब्दुल अलीम साब, हाफीज एकबाल साब, हाफीज मोईन साब, हाफीज आसीफ साब, मुसा आफीज साब, हाफीज शाहरुख, मौलाना ईरफान, मौलाना वजीर बेग व तसेच परिसरातील मुस्लिम समाज उपस्थित होता.
समतेचा परंतु ऐतिहासिक संदेश –
दरम्यान वाळूज येथेही पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी बकरी ईद व आषाढी एकादशीचे महत्त्व तसेच सामाजिक सलोखा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मुस्लिम समाजाने गुरुवारी (ता. 29) रोजी एकादशीला बकरी ईद साजरी न करता तसेच कुर्बानी न देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला समतेचा संदेश दिला.
