
वाळुज महानगर, (ता.13) – चोरटी वाहतूक करून अवैधरित्या विक्रीसाठी साठवलेला सुमारे पन्नास लाख रुपये किंमतीचा जवळजवळ 630 ब्रास वाळूसाठा जेसीबी मशीन हायवा असा ऐवज जप्त केल्याने परिसरातील वाळू माफियाचे चांगले धाबे दणाणले आहे. ही कारवाई रविवारी शिवपूर (ता. गंगापूर) शिवारात करण्यात आली.

वाळूज परिसरातील शेंदूरवादा व शिवपूर या परिसरात वाळूची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक व विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळताच त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन सय्यद, पोउपनि भगवान मुजगुले, संदीप शेवाळे, सय्यद हनीफ यांचे पथक तयार केले. तसेच तहसीलदार सतीश सोनी यांनाही याबाबत कळवले. त्यानंतर मंडळ अधिकारी अनिल हुगे व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून तपासणी केली असता मौजे शिवपूर गावठाण गट नंबर 9 येथे ईसा बाबा सय्यद याने केलेला वाळू साठा, काकासाहेब रामनाथ दुबिले याचा ब्रास वाळू साठा, वसंत मनोहर दुबिले याने गट नंबर 36 मधील वाळू साठा, 
संतोष विष्णू दुबिले यांचे शेत गट नंबर 113 मधील वाळू साठा असा एकूण 630 ब्रास वाळू साठा आढळून आला. यावेळी एक जेसिबी मशीन, एक हायवा ट्रक असा एकूण 50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पथकात पोलीस हवालदार अभिमन्यू सानप, जगदीश खंडाळकर, आनंद वाहूळ, जयेश जाधव, विजय पिंपळे, चालक मल्हार गरगडे, महिला पो. ज्योती सूर्यवंशी यांच्यासह महसूलचा समावेश होता.
