
वाळूजमहानगर, (ता.12) – अल्पवयीन 14 वर्षीय मुलगी शाळेत जाताना व येताना पाठलाग करुन तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करून प्रत्यक्ष तसेच फोनवर तिच्यासोबत लग्न करण्याबाबत वारंवार धमकावणाऱ्या एका तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सोमवारी (ता.12) रोजी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यामुळे तो आता पोलिसांची हवा खात आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नुकतीच नववी पास झालेली पीडित 14 वर्षीय मुलगी आई, वडील, भाऊ व बहिणीसह वाळूज येथे राहते. अयान पठाण रा. लांझी रोड, वाळुज याने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या डिसेंबर महिन्यात पंढरपूर येथे फिरायला घेऊन गेला होता. ही कुणकुण कानावर येताच पिडित मुलींची आई मुलीस स्वतः तीला शाळेत सोडुन पुन्हा शाळेपासुन घरी आणु लागली. त्यामुळे अयान पठाण याने पिडित मुलीस सिमकार्ड व मोबाईल फोन घेवुन दिला. तसेच अयान पठाण हा नेहमी नेहमी तिच्या शाळेसमोर शाळा सुटण्याच्यावेळेस येत होता. व शाळा सुटल्यानंतर तिच्याजवळ जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत लगट करत असे. तसेच त्याने दिलेल्या मोबाइलवर त्याच्या मोबाइलवरुन नेहमी नेहमी फोन करुन लग्न करणेबाबत विचारत असे. एवढेच नव्हे तर पठाण याने पीडित मुलीच्या आईच्या मोबाइलवर फोन करुन सांगितले की, ती व मी प्रेम करतो, तिचे लग्न माझ्यासोबत करुन द्या. त्यावरुन त्यास नकार देत तु माझ्या मुलीचा पिच्छा करणे सोडुन दे, असे पीडित मुलीच्या आईने सांगितले होते. तसेच त्याच्या आईला देखील अयान पठाण हा मुलीचा लग्न करण्यासाठी पाठपुरावा करतो, त्यास समजावुन सांगा. असे सांगितले. तरीही अयान पठाण याने 16 मे 2023 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास पिडित मुलगी शाळेतून घरी जात असताना तिच्याजवळ जाऊन तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. त्यास विरोध केला, तरी देखील त्याने त्याचे सोबत लग्न करणार की नाही असे विचारले. त्याला नकार दिला असता त्याने तिला मारहाण केली. व तुझ्या घरच्या लोकांचा विरोध असेल तर आपण पळुन जाऊ अशी धमकी दिली. तसेच अयान याने तिच्या मोबाइलवरुन तिचे ड्रेस मधील फोटो मागवुन घेवुन ते फोटो त्याच्या आईच्या मोबाइलवर पाठविले. बदनामी होईल म्हणुन पीडित मुलीच्या आईने तक्रार केली नाही, परंतु तो मुलीस त्रास देतच असल्याने अखेर वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत सोमवारी (ता.12) रोजी फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून तो आता पोलिसांची हवा खात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोले करीत आहे.
शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला –
पिडित मुलगी ज्या शाळेत शिकत होती, तेथील शिक्षीकेने अल्पवयीन मुलीच्या आईला शाळेत बोलावुन सांगितले होते की, तुमची मुलगी कोणत्या तरी मुलाच्या गाडीवर बसुन जाताना दिसली होती, तिच्यावर लक्ष ठेवा. त्यावरुन पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तिला तु कोणत्या मुलासोबत मोटार सायकलवर बसुन कुठे गेली होती. असे विचारले असता तिने आपबिती सांगितली. जर पीडित मुलीच्या शाळेतील शिक्षिकेने सतर्कता बाळगली नसती, तर मोठा अनर्थ घडला असता.
