
वाळूजमहानगर, (ता.24) – मसिआ आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या तर्फे उद्या गुरुवारी (ता.25) रोजी मसिआ वाळूज येथे ‘भव्य रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात उद्योजक, कर्मचारी, कामगार व इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या शहरातील रुग्णालयात विविध आजारावर उपचार घेत असलेल्या गंभीर रुग्णांना रक्ताची गरज वारंवार लागत आहे. शहरातील रक्तपेढ्यांकडे उपलब्ध असलेला रक्तसाठा त्यासाठी अपुरा पडत आहे. नागरिकांनी केलेल्या रक्तदानामुळे पाहिजे त्या गटाचे रक्त आवश्यकतेनुसार संबंधित रुग्णांना प्राप्त झाले तर त्यांचा जीव वाचू शकतो. म्हणूनच म्हटले आहे की, ‘रक्तदान हेच जीवनदान’. आपल्या रक्तदानातून कोणाचा तरी जीव वाचला तर तीच खरी मानवसेवा व समाजसेवा ठरते. त्यामुळे रुग्णांसाठी रक्ताची हीच गरज ओळखून मसिआने घाटी हॉस्पिटल आणि शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन इंड्रेज हाऊजर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नारायणन यांचे हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाळूज येथील अनिल विश्वासराव चव्हाण सभागृह एमआयडीसी वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन आपण रक्तदान करावे. तसेच आपण स्वतः व आपल्या कंपनीतील कर्मचारी, कामगार, कुटुंबीय आणि परिचयातील मित्र यांना रक्तदान करण्यास पाठवावे. या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे. असे आवाहन मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील आणि संपूर्ण कार्यकरिणीने केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख व सह-प्रसिद्धीप्रमुख श्रीराम शिंदे यांनी कळविले आहे.
