
वाळुज महानगर (ता.30) – गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी वाळूज येथे सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी 80 टक्के मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला. राजकीय पक्षासह अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सायंकाळी या निवडणुकीचा निकाल येणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
गंगापूर तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला रविवारी (ता.30) रोजी सकाळी सुरुवात झाली. एकूणच 18 जागा असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होत आहे. 1 हजार 648 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहे.
या निवडणूक रिंगणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट -राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे शिवशाही शेतकरी विकास पॅनल, भाजपा – शिवसेना शिंदे गटाचे शेतकरी बळीराजा विकास पॅनल तर काँग्रेसचे शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. वाळुज मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघातून 358 पैकी दुपारी 2 वाजेपर्यंत 304 मतदारांनी मतदान केले.
ही टक्केवारी 84.91 वर पोचली. तर ग्रामपंचायत मतदार संघातून 345 पैकी 261 म्हणजेच 75.65% मतदान झाले. तिरंगी लढत होत असलेल्या या निवडणुकीत राजकीय पक्षाची दिग्गजांची प्रतिष्ठा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पणाला लागल्या आहेत. सायंकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. दरम्यान वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
