
वाळूजमहानगर, (ता.28) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार पुतळ्याची दुरावस्था झाली, कामगार दिन दोन दिवसावर येऊन ठेपला. तरीही एमआयडीसी प्रशासन झोपेत आहे. त्यामुळे न्यू पॅंथर कामगार सेनेच्या वतीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामगार पुतळाचे सुशोभीकरण करण्यात यावे. अशी मागणी गुरुवारी (ता.28) रोजी करण्यात आली.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील पंढरपूर येथे छत्रपती संभाजीनगर – पुणे महामार्गावर कामगार पुतळ्याची स्थापना करण्यात आलेली आहे. अत्यंत रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे. शिवाय प्रत्येक वर्षी 1 मे या कामगार दिनानिमित्त या पुतळ्याची रंगरंगोटी करण्यात येते. मात्र कामगार दिवस दोन दिवसावर येऊन ठेपलाय तरीही कामगार पुतळ्याची व चबुतर्याची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे न्यू पॅंथर कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी एमआयडीसी कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार पुतळ्याची रंगरंगोटी व सुशोभीकरण करून त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात यावी. या संदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण नितनवरे, संतोष लाटे, सुनील सदावर्ते, किशोर साळवे, सुनील साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
