May 5, 2026

वाळूज महानगर, (ता 27) – सर्वजण गाढ झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून वृद्ध आजीचे तोंड दाबून बुक्क्याने मारहाण करत तिच्या अंगावरील तसेच लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने घेत असताना आजी ओरडली. त्यामुळे घराबाहेर झोपलेला नातू धावत आला. आणि चोरट्यांनी धूम ठोकली. यात जवळजवळ दीड लाख रुपयाचा ऐवज चोरट्याने लंपास केला. गुरुवारी (ता.27) रोजी भल्या पहाटे 1.15 वाजेच्या सुमारास गुरुधानोरा येथे घडलेल्या या घटनेत 65 वर्षीय वृद्ध आजी जखमी झाली.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाळु अशोक आघम वय 30 वर्ष रा. गुरुधानोरा हे पत्नी कल्याणी, आई रेखाबाई, वडील अशोक व आजी आसराबाई यांच्यासह शेत वस्तीवर राहतात. ते दोन दिवसापासून बाजरी सोंगण्याचे काम करत असून त्यांच्याकडे बहीन छाया नितीन गायकवाड रा.वैजापुर ही आलेली आहे. बुधवारी (ता.26) रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण करून सर्वजण 8 वाजेच्या सुमारास घराबाहेर झोपले.

 

तर आजी आसराबाई उत्तम आघम घरामध्ये झोपली होती. गुरुवारी (ता.27) रोजी भल्या पहाटे 1.15 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. व आत मध्ये झोपलेल्या आजीला दर्डावत “तु गप्प बस, आरडाओरडा करु नको” असे म्हणुन एकाने तोंड दाबुन धरले व दुसऱ्याने मारहाण करत गळ्यातील सोन्याची पोत, कानातील फुलं, हातातील चांदीची पाटली असे जबरदस्तीने काढुन घरातील लोखंडी पेटी घेवुन पळुन गेले. चोरट्याच्या तावडीतून सुटताच आजी आसराबाई ओरडली बाळु, इकडे लवकर ये. तिचा आवाज ऐकून घराबाहेर झोपलेले सर्वजण उठले. व विचारले असता आजीने आपबिती सांगितली. त्यानंतर खोलीची पाहणी केली असता सामान, कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. शिवाय घरातील पेटी न दिसल्याने गावातील विनोद इथापे याच्या मदतीने घराच्या आजु बाजुला शोध घेतला असता घराच्या पाठीमागे लोखंडी पेटी पडलेली दिसली. मात्र पेटीत ठेवलेले आई व पत्नी तसेच मुलीचे दागिने लंपास केल्याचे दिसले.

या चोरी मध्ये चोरट्यांनी 40 हजार रुपये किमतीची एक तोळा सोन्याची एकदाणी, 24 हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 40 हजार रुपये किमतीचे एक तोळा सोन्याचे नेकलेस, कानातील अडीच ग्रॅमचे बहुराणी फुले, 16 हजार रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व काळे मणी, 8 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन ग्रॅम वजनाचे कर्णफुले, 3 हजार रुपये किमतीची 50 ग्रॅम वजनाची दंडातील चांदीची पाटली व मुलीच्या दंडातील चांदीच्या बाहुट्या, 10 हजार रुपये किमतीचे मुलीच्या कानातील दोन ग्रॅम सोन्याच्या बाळ्या व चांदीचे पायातील 20 ग्राम वजनाचे वाळे. असा एकूण 1 लाख 41 हजार रुपये किमतीचा सोन्याचांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

याप्रकरणी बाळु अशोक आघम रा. गुरुधानोरा यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 394, 34 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *