
वाळूजमहानगर, (ता.8) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात कारने रस्ता ओलांडणाऱ्या दोन महिलांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही महिलांचे पाय होऊन गंभीर जखमी झाल्या. हा अपघात मंगळवारी (ता.4) रोजी रात्री वाळूज जवळील हनुमाननगर समोर झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हनुमाननगर येथील पद्माबाई हरिचंद्र व्यवहारे व वत्सलाबाई जाधव या दोन महिला स्मॉल वंडर्स स्कूल ते हनुमाननगर जात असताना पुणे – छत्रपती संभाजीनगर महामार्ग ओलांडत होत्या. त्याचवेळी वाळूजकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव कारने व्यवहारे व जाधव या दोन्ही महिलांना जोराची धडक दिली. मंगळवारी (ता.4) रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात वत्सलाबाई व पद्माबाई या महिलांचे पाय फ्रॅक्चर झाले. त्यामुळे त्यांना गंभीर अवस्थेत उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कारभारी देवरे करीत आहे.
