
वाळूजमहानगर (ता.20) – अनुसूचित जमाती (एस टी. प्रवर्ग) साठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी एकाही सदस्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने ईटावा सरपंच निवडीसाठी सोमवारी (ता.20) रोजी दुसर्यांदा घेण्यात आलेली विशेष सभा वांझोटी ठरली. विशेष म्हणजे यापुर्वीही झालेली विशेष सभा याच कारणामुळे निष्फळ ठरली होती. तर ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार सरपंचपदाची निवडणूक ही यापूर्वी झाल्याप्रमाणे जनतेतून व्हायला हवी. मात्र प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे मत काही ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले.
वाळूज परिसरातील ईटावा ग्रामपंचायत ही घाणेगाव ग्रुप ग्रामपंचायत मधून विभक्त होऊन नव्याने 19 सप्टेंबर 2019 रोजी अस्तित्वात आली. त्यानंतर 9 जानेवारी 2020 रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे अनुसूचित जमाती (एस टी. प्रवर्ग) साठी राखीव असून त्यावेळी रंगीता देवबोने या जनतेतून निवडून आल्या. मात्र जात वैधता प्रमाणपत्रा अभावी देवबोने या सरपंचपदावरून पायउतार झाल्या. जात प्रमाणपत्र वैधताअभावी तत्कालीन सरपंचासह कावेरी मुदीराज या सदस्याचे पद गेले होते. मात्र फेर निवडणुकीत मुदीराज या पुन्हा निवडून आल्या. याच दरम्यान सरपंच निवडीसाठी सुद्धा निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र त्यावेळीही जात वैधता प्रमाणपत्र कोणाकडेही नसल्याने निवड रद्द झाली होती. तेव्हापासून रिक्तच असलेल्या ईटावाच्या सरपंच पदाच्या निवडीसाठी पुन्हा सोमवारी (ता.20) रोजी गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रूपाली मोगरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत सरपंचपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनिता कैलास शिनगारे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. मात्र अर्ज छाननीत नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडले नसल्याने सुनिता शिनगारे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे सोमवारी बोलवण्यात आलेली विशेष सभाही जात वैधता प्रमाणपत्राअभावी वांझोटी ठरली. या विशेष सभेला रामकिसन कडूबा म्हस्के, नरसिंग रामसिंग माळी, कावेरी योगेश मुदीराज, आण्णा गोरखनाथ गागंर्डे, सुवर्णा बबन गव्हाणे, सुनिता कैलास शिनगारे, रूपेश किसन जाधव, रंजना बळवंत सुर्यवंशी, वंदना बाबासाहेब घुले उपस्थित होते.
सरपंचपदाच्या निवडीत बदल –
दरम्यान ईटावा ग्रामपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीत सरपंचपदासाठी जनतेतून मतदान घेण्यात आले होते. मात्र आता प्रशासन सरपंचपदासाठी जनतेतून मतदान न घेता सदस्यातुन सरपंचपदाची निवडणूक घेत आहे. सरपंच पदाच्या निवडीबाबत हे कायद्यानुसार नसल्याचे मत विशेष सभेनंतर काही ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश –
ईटावा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड यापूर्वी जनतेतून घेण्यात आली होती. आता समस्यांमधून घेण्यात येत आहे. यासंदर्भात गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, ईटावा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी राबवण्यात आलेली आजची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राबवण्यात आली. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा.
