
वाळूज महानगर, (ता.11) : – स्कुटीवर आलेल्या दोन जणांनी कारला कट मारला. त्याचा जाम विचारला असता त्यांनी फोन करून इतरांना बोलावले आणि कार चालकास बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बजाजनगर येथे गुरुवारी (ता.9) रोजी रात्री घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उमेश शेषराव धुदाट वय 35 रा. सिडको वाळूज महानगर -1 हे
गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकातून सिडको वाळूज महानगर-1 कडे कार (एम एच 20, ईई – 7705) मधून जात असताना मोहटा देवी मंदिराजवळ त्यांच्या कारला स्कुटीवर आलेल्या दोघांनी कट मारला. त्यांना कट का मारला असे विचारताच स्कूटीवरील दोघांनी फोन करून त्यांच्या साथीदारांना बोलावून घेतले. आणि उमेश धुदाट यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उमेश धुदाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमर घायवट, प्रदीप यादव, जय रोरे, भगवान रोरे, संदीप व अन्य अनोळखी दोन अशा 7 जणांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
