वाळूजमहानगर, (ता.27) :- सततची वाहन दुरुस्ती, खर्च होणारा पैसा व वेळ, न मिळणारे उत्पन्न तसेच शोरूम चालक, व्यवस्थापनाकडून न मिळणाऱ्या प्रतिसादाला कंटाळून व शेतकऱ्याची ही क्रूर चेष्टा सहन न झाल्याने स्वतः मालकानेच पेट्रोल टाकून ई रिक्षा जाळून टाकली. ही खळबळ जनक घटना छत्रपती संभाजीनगर येथील रत्नप्रभा शोरूम मध्ये सोमवारी (ता.27) रोजी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील घृष्णेश्वर हॉस्पिटलचे डॉ.प्रसाद पाटील यांचे टेंभापुरी येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊस मधील दूध छत्रपती संभाजीनगरात आणण्यासाठी त्यांनी ई रिक्षा (एम एच 20, ई के -1122) खरेदी केली होती. मात्र खरेदी केलेली ई रिक्षा नेहमी नादुरुस्त होत होती. ही रिक्षा दुरुस्ती करण्यासाठी प्रसाद पाटील यांनी अनेक वेळा छत्रपती संभाजीनगर येथील रत्नप्रभा शोरूम मध्ये नेली. मात्र ती योग्य प्रकारे दुरुस्त झालीच नाही. प्रसाद पाटील यांनी ही रिक्षा दुरुस्त करण्यासाठी 20 हजार रुपये खर्च केले. शिवाय सुमारे 20 दिवस शोरूम मध्ये रिक्षा ठेवली. तरीही ती दुरुस्त झाली नाही. ते साठी व्यवस्थापन प्रतिसाद देत नाही, थातूरमातूर दुरुस्त केल्यानंतर ती पुन्हा पुन्हा नादुरुस्त होत असे.

त्यामुळे दररोज आणण्यात येणारे दूध खराब होऊन वाया जात असे. त्यातून मिळणारा नफा दूरच मात्र नुकसानीचे प्रमाण वाढत होते. ही रिक्षा दुरुस्त करण्यासाठी सोमवारी (ता.27) रोजी डॉ. प्रसाद पाटील, अरविंद गायकवाड व राहुल साध्ये हे रत्नप्रभा शोरूम मध्ये गेले. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, रिक्षा दुरुस्तीसाठी आणखी एक महिना येथे ठेवावी लागेल. त्यामुळे रागाच्या भरात डॉ. प्रसाद पाटील यांनी शोरूम मध्येच रिक्षावर पेट्रोल टाकून दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास सर्वांसमक्ष ई रिक्षा जाळून टाकली.
विचारपूर्वक जाळली – डॉ- प्रसाद पाटील
याबाबत डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले की, माझ्या फार्म हाऊस मधील दूध शहरात आणण्यासाठी रिक्षा घेतली होती. ती सतत नादुरुस्त व्हायची, दुरुस्तीसाठी 20 हजार रुपये खर्च केला. वेळ गेला. शिवाय दररोजचे 300 लिटर दूध वाया गेले. तसेच शोरूम व्यवस्थापनाकडून न मिळणारा प्रतिसाद. याला कंटाळून मी स्वतः रत्नप्रभा शोरूम मध्येच पेट्रोल टाकून ई रिक्षा विचारपूर्वक जाळून टाकली असे सांगितले.
याबाबत रत्नप्रभा शोरूमच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती न देता टाळाटाळ केली.

