वाळूज महानगर (ता.14) :- गंगापूर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत पॅनल यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनलचा कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने धुव्वा उडवत सर्वच्या सर्वच जागा काबीज केल्या. विशेष म्हणजे आमदाराला स्वतः त्यांची जागा सुद्धा राखता आली नाही. त्यामुळे येणारी निवडणूक आमदार प्रशांत बंब यांना चांगलीच जड जाणार. अशी चर्चा या निवडणूकीच्या निकालानंतर सुरू होती.
गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत आमदार प्रशांत बंब आणि कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली. वीस जागांसाठी 40 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव बिनविरोध निवडून आलेले आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी (ता.12) रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीची सोमवारी (ता.13) मतमोजणी झाली. या निवडणूकीत आमदार प्रशांत बंब यांना शेतकरी सभासदांनी नाकारल्याने त्यांच्या पॅनलला एक सुद्धा जागा मिळाली नाही. त्यामुळे प्रशांत बंब यांच्या चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या आमदार प्रशांत बंब यांना त्यांची स्वतःची सुद्धा जागा राखता आली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील चित्र बदललेले दिसणार असल्याचे दिसून येते.
विजयी उमेदवार
जामगाव गट : सुरेशचंद्र मनाळ, कचरू शिंदे, प्रवीण वालतुरे. लासूर स्टेशन : कृष्णा पाटील डोणगावकर, कारभारी गायके, दादासाहेब जगताप. गंगापूर गट : बाबूलाल शेख, शेषराव साळुंके, मधुकर साळुंके. शेंदूरवादा गट : प्रल्हाद निरफळ, अप्पासाहेब गावंडे, मनोहर दुबिले. वाळूज गट : दिलीप बनकर पाटील, भाऊसाहेब पाटेकर, तुकाराम दादा कुंजर. महिला प्रतिनिधी : माया दारूटे, शोभाबाई भोसले. इतर मागासवर्गीय प्रवर्ग : नामदेव दारूंटे. अनुसूचित जाती, अनु. जमाती प्रवर्ग : काशिनाथ गजहंस. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्ग : देवचंद राजपूत.
